राज्यातील सरकार ‘ईडी -सीबीआय’चे, कोल्हापुरात ‘आप’च्या निर्धार सभेत शिंदे सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 05:16 PM2023-06-01T17:16:48+5:302023-06-01T17:17:10+5:30
चंद्रकांत पाटील यांना पैशाची मस्ती
कोल्हापूर : महाराष्ट्रातील सरकार जनतेने निवडून दिलेले सरकार नाही तर ईडी, सीबीआयने सत्तेत आणलेले सरकार आहे म्हणूनच आगामी निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील रयतेचे सरकार आणण्यासाठी ‘आप’चे बटण दाबण्याचे आंदोलन हाती घ्या, असे आवाहन आम आदमी पक्षाचे राज्याचे सहप्रभारी गोपाल इटालिया यांनी बुधवारी रात्री मिरजकर तिकटी येथील निर्धार सभेत बोलताना केले.
आम आदमी पक्षाच्या पंढरपूर ते रायगड या स्वराज्य यात्रेचे बुधवारी कोल्हापुरात शहरात आगमन झाले. त्यानिमित्ताने या निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
रयतेचे राज्य यावे ही छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना होती. परंतु आज देशात आणि राज्यात रयतेला लूटणारी सरकार सत्तेत आहेत. या सरकारकडे विकासकामांना, शेतकऱ्यांना मदत करायला, शिक्षणावर खर्च करायला पैसे नाहीत पण निवडणुका आल्या की मते मिळविण्यासाठी यांच्याकडे पैसे येतात. प्रत्येक गोष्टीसाठी रयतेला आंदोलन करावे लागत आहे. आता एक आंदोलन हे सरकार हटविण्यासाठीही हाती घ्या, असे आवाहन इटालिया यांनी केले.
स्वराज्य यात्रेचे फेरी
तत्पूर्वी, आम आदमी पक्षाच्या स्वराज्य यात्रेची सुरुवात दसरा चौक येथून झाली. डोकीवर पक्षाची टोपी, हातात ध्वज घेतलेले शेकडो कार्यकर्ते स्वराज्य यात्रेत सहभागी झाले होते. 'आम आदमी की लहर हैं ' या गीताने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. या यात्रेत पक्षाचा रथ, ऑटो रिक्षा होत्या.
चंद्रकांत पाटील यांना पैशाची मस्ती
कोल्हापुरातून निवडून येऊ शकत नाही म्हणून मंत्री चंद्रकांत पाटील पुण्याला गेले तेथे टीका झाली तेव्हा त्यांनी काेणत्याही मतदार संघातून मी निवडून येऊ शकतो, असा दावा केला. हा माणूस पोत्याने पैसे वाटतो. त्यांना पैशांची मस्ती आहे. त्यांनी आपच्या विरोधात कोल्हापुरातून निवडणूक लढवावी, असे आव्हान रंगा राचुरे यांनी सभेत दिले. यावेळी नीलेश रेडेकर, उत्तम पाटील, संदीप देसाई यांची भाषणे झाली. शशांक लोखंडे यांनी आभार मानले.