प्रशासक बलकवडे यांच्याकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:24 AM2021-02-10T04:24:29+5:302021-02-10T04:24:29+5:30

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी हळूहळू आपल्या कामाची जरब दाखविण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी झालेल्या विभागप्रमुखांच्या ...

Criticism of officials from Administrator Balkwade | प्रशासक बलकवडे यांच्याकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी

प्रशासक बलकवडे यांच्याकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी

Next

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी हळूहळू आपल्या कामाची जरब दाखविण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली. काही अधिकारी थातुरमातुर उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत असताना, त्यांना तर झापलेच शिवाय उपायुक्तांनाही अशा अधिकाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या.

गेल्या आठवड्यात प्रशासक बलकवडे या रजेवर होत्या. त्यामुळे आठ दिवस महापालिकेच्या सर्वच विभागप्रमुख तसेच त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांनी मौजमजा केली. प्रशासक नसल्यामुळे त्यांची कार्यालयातील हजेरी कमी आणि बाहेर फिरतीच जास्त होती. त्यामुळे मागच्या आठवड्यात शहरातील नागरिकांना कामासाठी केवळ फेऱ्या मारणेच नशिबी आले. त्यामुळे प्रशासकांनी सर्वप्रथम विभागवार आलेल्या तक्रारी आणि त्यांचे निराकरण, शिल्लक असलेल्या तक्रारी यांचा आढावा घेतला.

आढावा बैठकीत विशेषत: घरफाळा, नगररचना, विभागीय कार्यालयातील अधिकारी प्रशासकांच्या झाडाझडतीत आघाडीवर होते. घरफाळा थकबाकी वसुलीबाबतही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील विनापरवाना डिजिटल फलक काढण्यावरुन झालेल्या चर्चेत एका उपशहर अभियंत्यास बलकवडे यांनी चांगलेच फैलावर घेतले. अवैध फलक लावणाऱ्य कितीजणांवर फौजदारी गुन्हा दाखल केला, अशी विचारणा बलकवडे करत असताना, हे शहर उपअभियंता ‘मॅडम फलक काढतोय, रोजच कारवाई सुरू आहे, असे सांगत राहिले. त्यामुळे बलकवडे भडकल्या. ‘मी तुम्हाला फौजदारी कारवाईचे विचारत आहे, त्याचे उत्तर द्या’ अशा शब्दात त्यांनी या अधिकाऱ्यास झापले. शेवटी उपायुक्त शिल्पा दरेकर यांना त्यांच्या कामावर लक्ष ठेवण्याची सूचना बलकवडे यांनी केली.

महापालिकेतील अधिकारी भेटत नाही, ही प्रमुख तक्रार नागरिकांकडून होत आहे. ज्या ज्यावेळी नागरिक प्रशासकांना भेटतात, तेव्हा हीच एक मोठी तक्रार होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन त्यांचे निराकरण करावे, असा आग्रह प्रशासकांचा आहे. प्रत्येक आठवड्याला त्या तक्रारी व त्यांचे निराकरण यावरच प्रथम चर्चा करतात. तरीही अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा होत असल्याचे लक्षात येत आहे. गेल्या आठवड्यातील सर्व बॅकलॉग भरून काढत बलकवडे यांनी मंगळवारी दिवसभर बैठकींचा सपाटा लावला.

Web Title: Criticism of officials from Administrator Balkwade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.