केवळ राजकारणातून केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:22 AM2021-02-12T04:22:20+5:302021-02-12T04:22:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना आणि प्रकल्पांसाठी ३ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना आणि प्रकल्पांसाठी ३ लाख ५ हजार ६११ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. परंतु केवळ राजकारणातून या अर्थसंकल्पावर टीका सुरू असल्याचा दावा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.
कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या दरेकर यांनी गुरुवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. दरेकर म्हणाले, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अर्थसंकल्प पाहिलेला नाही. तो न वाचताच टीका सुरू केली आहे. परंतु राज्यातील रस्ते बांधणीसाठी १ लाख कोटी रुपये, मुंबईच्या पाणी पुरवठ्यासाठी ३ हजार कोटी, घरोघरी पाणी योजनेसाठी १ हजार कोटी, रेल्वेसाठी सात हजार कोटी, शेतकऱ्यांच्या कर्जासाठी १० लाख ५० हजार कोटी, अशा चौफेर विकासासाठी निधीची तरतूद केली आहे. कोरोनामुळे अडचणीत आलेल्या नागरिकांची मान दाबून होणाऱ्या वसुलीची किंमत राज्य सरकारला मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, समरजित घाटगे, माजी आमदार अमल महाडिक, शौमिका महाडिक, अशोक देसाई, विजय जाधव, नाथाजी पाटील, पृथ्वीराज यादव, भगवान काटे उपस्थित होते.
चौकट
सूडभावनेचा परमोच्च बिंदू
दरेकर म्हणाले, घटनेने घालून दिलेल्या प्रथा, परंपरा आहेत. मात्र त्या बाजूला ठेवून राज्यपालांच्या विमान प्रवासाला परवानगी टाळून महाविकास आघाडीने सूडभावनेचा परमोच्च बिंदू गाठला आहे. राज्यपालांना उतरवणाऱ्या सरकारला लोकही खाली उतरवतील.
चौकट
मुश्रीफ हे मंत्रिमंडळातील विरोधी पक्षनेते
मुश्रीफ हे प्रत्येक आठवड्याला एक इशारा देत असतात. सरकारच्या मंत्रिमंडळात असूनही विरोधी पक्षनेत्यासारखा वागणारा हा एकमेव मंत्री आहे, अशा शब्दात दरेकर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना मुश्रीफांना टोला लगावला.