‘गडहिंग्लज’च्या यात्रेत कोट्यवधीची उलाढाल
By admin | Published: February 13, 2017 12:11 AM2017-02-13T00:11:00+5:302017-02-13T00:11:00+5:30
लाखो भाविकांची गर्दी : अमाप उत्साहात काळभैरीचे दर्शन
गडहिंग्लज : सीमाभागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान गडहिंग्लजचे ग्रामदैवत श्री काळभैरवाची यात्रा अमाप उत्साहात पार पडली. लाखावर भाविकांनी ‘श्रीं’चे दर्शन घेतले. यात्रेनिमित्त कोट्यवधीची उलाढाल झाली. सीमाभागासह महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्याच्या कानाकोपऱ्यांतून भाविक दर्शनासाठी आले होते.
‘काळभैरीऽऽ...बाळभैरीऽऽ..’चा गजर करत मध्यरात्रीपासूनच बसगाड्या, दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक व बैलगाडीने भाविक दर्शनासाठी डोंगरावर जात होते. मध्यरात्री प्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांच्या हस्ते शासकीय पूजा झाली. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.
‘श्रीं’च्या दर्शनासाठी डोंगरावरील मंदिराच्या परिसरात मंडप व बॅरकेटस् बांधण्यात आले होते. दर्शनासाठी जाण्या-येण्याचा मार्ग स्वतंत्र ठेवण्यात आला होता. डोंगरावर दर्शनासाठी क्लोज सर्कीट टीव्हीची व्यवस्था केली होती. डोंगराच्या पायथ्याशी खेळणी, खाद्यपदार्थ, शीतपेये, तयार कपडे, मेवा-मिठाई, नारळ, कापूर-साखर विक्रेत्यांनी स्टॉल्स लावले होते.
डोंगरावर केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालयातर्फे मोफत वैद्यकीय सेवा, गडहिंंग्लज तालुका टु-व्हीलर मेकॅनिकल असोसिएशनतर्फे मोफत यंदाही बे्रक डाऊन सर्व्हीस पुरविण्यात आली. गडहिंग्लज आगारातर्फे जादा बसफेऱ्यांची सोय करण्यात आली होती. अनिरूद्धबापू फौंडेशन व गडहिंंग्लज अर्बन बँक कर्मचाऱ्यांनी सेवाकार्यात विशेष भूमिका बजावली. कचरा संकलनासाठी राष्ट्र सेवा दलातर्फे डोंगरावर ठिकठिकाणी बॉक्स ठेवले होते. भाविकांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा स्वागताचे फलक लावून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रा यशस्वीतेसाठी डी.वाय.एस.पी. रमेश पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र मांडेकर, बड्याचीवाडीच्या सरपंच गीता देसाई, उपसरपंच वैभव साबळे, मुख्याधिकारी तानाजी नरळे, बांधकाम उपअभियंता देसाई व मांगलेकर, पोलिस निरीक्षक विपीन हसबनीस यांच्यासह
जीर्णोद्धार समिती, पंचमंडळी, मानकरी आणि बड्याचीवाडी ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
तृप्ती देसाई यांनी घेतले दर्शन
भू-माता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले. जीर्णोद्धार समिती अध्यक्ष निरंजन कित्तूरकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला.