पीक बुडाले आणि सोबत स्वप्नेही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:21 AM2021-07-25T04:21:10+5:302021-07-25T04:21:10+5:30
दोन दिवसांच्या पावसाने होत्याचे नव्हते केले लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर: ज्या पिकाकडे बघून मन हरखून जायचं, पुढची स्वप्नं दिसायची ...
दोन दिवसांच्या पावसाने होत्याचे नव्हते केले
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर: ज्या पिकाकडे बघून मन हरखून जायचं, पुढची स्वप्नं दिसायची तेच पीक पुराच्या पाण्यात गुडूप झाल्याचे पाहताना बळीराजाचे मन गदगदून येतंय, डोळ्यात पाणी साठतंय, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले शिवार पाण्याने भरलेले पाहून हुंदका दाटून येतोय, महिन्यापासूनचे सारे कष्ट, पैसा पाण्यात गेल्याने आता पुढे काय़, या चिंतेने तर डोळाही लागेना झालाय.
जिल्ह्यात आलेल्या महापुरातील हे शेतकऱ्याचे प्रातिनिधिक चित्र. तसा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी कष्टाळू. भले मोठे शिवार नसले तरी आहे त्या तुकड्यात तो घाम गाळून सोने पिकवतो आणि तेही स्वतःच्या हिमतीवर. पण, गेल्या दोन वर्षांपासून तर नियतीने जणू परीक्षाच घेण्यास सुरुवात केली आहे. २०१९ ला ‘न भूतो न भविष्यती’ असा महापूर आला. जिल्ह्यातील २८६ गावातील ७८ हजार हेक्टरवरील उभी पिके कुजून गेली. मोठ्या कष्टाने पीक महापुराच्या एका तडाख्यात मातीमोल झाले. या जखमा घेऊनच शेतकरी पुन्हा कामास लागला. २०२० मध्ये दोन वेळा महापूर येता येता वाचला, बऱ्यापैकी पीक हातात आले, पुन्हा मागचे सगळे विसरून या खरिपाची तयारी केली. अगदी एप्रिल, मे महिन्यातील वादळाची तमा न बाळगता शेत पेरणीयोग्य केले. कोरोना असतानाही बियाणे, औषधे महागले असताना आणि इंधनाचे दर वाढल्याने मशागत महागली असतानाही बळीराजा शिवार फुलवण्यात व्यस्त झाला. मागचे दोन महिने राब राब राबून पीक आणले, आता वाढीच्या ऐन बहरात पिके असताना पुन्हा एकदा महापुराने धडक दिली. मागच्या पंधरवड्यात कडक उन्हामुळे कोमेजलेली पिके पाहून जीव तुटत होता, तोवर पावसाची भुरभुर सुरू झाल्याने जीवात जीव आला होता. पिकाकडे बघून आनंदात असतानाच केवळ दोन-तीन दिवसांत ढगफुटीसारख्या आलेल्या पावसाने आणि महापुराने होत्याचे नव्हते केले.
.........
महिनाभर घात नाही
ज्यांची शिवारे पूर्ण बुडाली त्यांची तर अपरिमित हानी झाली, ज्यांची माळराने आहेत, तीही जमीन पावसाच्या माऱ्याने खारवटून गेली आहेत. महिनाभर रानाला घाती येणार नाहीत, अशी परिस्थिती आहे.
नव्या खर्चाची भर
आता पीक तर कुजले आहेच, पण ते पूर ओसरल्यानंतर बाहेर काढून टाकायला देखील खर्च करावा लागणार आहे. उत्पन्न काहीच नाही, उलट नव्या खर्चाची भर पडणार आहे
........
भात पीकही धोक्यात
आभाळच फाटले आहे तर ठिगळ कुठं आणि कसं लावायचं, अशी परिस्थिती आहे. सगळी पिके जमीनदोस्त झाली असताना पंचनामे कसे आणि कधी करायचे, असा प्रश्न आहे. नदीकाठचा ऊस पूर्णपणे पाण्यात आहे, सोयाबीन, भुईमूग कुजल्यात जमा आहे. भात शंभर टक्के पाण्याखाली आहे, पण तोही पूर चार दिवसांत ओसरला तर जगू शकतात, अन्यथा भात पीकही धोक्यात आहे. भरपूर पैसे खर्च करून लावलेला भाजीपाला, आले, मिरचीसारखी पिके ही कुजल्यात जमा आहेत.
जिल्ह्यात यंदा वादळी पाऊस चांगला झाल्याने आणि मृगही वेळेत दाखल झाल्याने जून अखेरलाच ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या, मागच्याच आठवड्यात भात रोप लागणीही पूर्ण झाल्या होत्या, त्यामुळे पेरणीचा टक्काही शंभर टक्क्यांवर गेला होता.