गळीत हंगाम आॅक्टोबरमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 11:41 PM2018-04-26T23:41:39+5:302018-04-26T23:41:39+5:30
कोल्हापूर : यंदा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत उसाचे प्रमाण जादा आहे. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यातच उसाचा गाळप हंगाम सुरू करावा लागेल, असे निर्देश पुणे साखर आयुक्तालयाचे सहसंचालक (विकास) डी. आय. गायकवाड यांनी गुरुवारी कोल्हापूर व सांगलीतील साखर कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. यानंतर त्यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या प्रधान कार्यालयात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांच्या शेती अधिकाºयांची बैठक झाली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख उपस्थिती प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावळ, कार्यालयीन अधीक्षक रमेश बारडे, लेखापरीक्षक विजय पाटील, विभागीय कृषी अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील, आदींची होती.
साखर आयुक्तालयाचे सहसंचालक डी. आय. गायकवाड यांनी दोन टप्प्यांत शेती अधिकाºयांसोबत बैठक घेऊन ऊस उत्पादनाबाबत माहिती घेतली. यावर जवळपास सर्वच अधिकाºयांनी यंदा उसाचे बंपर उत्पादन होणार असल्याचे सांगितले.
गतवर्षी कोल्हापूर व सांगलीमध्ये २१३.२७ लाख टन उसाचे गाळप झाले. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १३७.९८ लाख टन व सांगली जिल्ह्यातील ८०.२९ लाख टन गाळप झाले होते. त्या तुलनेत यंदा म्हणजे २०१८-१९ साठी १३७.९४ लाख टन कोल्हापूर जिल्ह्यात व ८९.८१ लाख टन सांगली जिल्ह्यात असे मिळून २२७.८५ लाख टन ऊस उत्पादन होणार आहे.
गतवर्षीच्या तुलनेत सांगली जिल्ह्यात ९.६२ लाख टन व कोल्हापूर जिल्ह्यात ४.९६ मेट्रिक टन असे १४.५८ लाख टन उत्पादन वाढले आहे. यंदा मोठ्या प्रमाणात ऊस असल्याने ऊस गळीत हंगाम आॅक्टोबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात सुरू करावा, असे निर्देश सर्व शेती अधिकाºयांना दिले, असे गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
यंदा ऊसतोडणी यंत्रांवर भर
मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, आदी भागांतील ऊसतोडणी मजूर यावर्षी येण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी जास्तीत जास्त हार्वेस्टर (ऊसतोडणी यंत्र)चा वापर करण्याची गरज आहे. सध्या कारखान्यांकडे २५२ हार्वेस्टर उपलब्ध असून ३००ची मागणी करण्यात आली आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.