‘एफआरपी’सह गाळप हंगामाची रणनीती ठरणार

By admin | Published: October 8, 2015 01:01 AM2015-10-08T01:01:30+5:302015-10-08T01:04:11+5:30

तिढा आज सुटणार ? : जिल्हा बॅँकेत साखर कारखानदारांच्या बैठकीत होणार निर्णय

Crop season strategy with 'FRP' | ‘एफआरपी’सह गाळप हंगामाची रणनीती ठरणार

‘एफआरपी’सह गाळप हंगामाची रणनीती ठरणार

Next

कोल्हापूर : आगामी साखर हंगामातील ‘एफआरपी’बाबत नेमकी काय भूमिका घ्यायची? याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत आज, गुरुवारी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील साखर कारखानदारांची बैठक होत आहे. हंगाम कधी सुरू करायचा? ‘एफआरपी’चा तिढा कसा सोडवायचा? याबाबत या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. साखरेच्या घसरलेल्या दरामुळे गत हंगामातील ‘एफआरपी’ देताना साखर कारखान्यांची दमछाक उडाली आहे. अनेक कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांचे पैसे दिलेले नाहीत. तोपर्यंत नवीन हंगाम समोर आला आहे. साखरेच्या दरात फारशी सुधारणा न झाल्याने यंदाही ‘एफआरपी’चा गुंता कायम राहणार आहे. यासाठी साखर कारखान्यांनी आपल्या सर्वसाधारण सभेत ‘एफआरपी’ तीन टप्प्यांत देण्याचे ठराव केले आहेत; पण याला शेतकरी संघटनांनी विरोध केला आहे. ‘एफआरपी’ एकरकमीच मिळाली पाहिजे, यावर शेतकरी संघटना ठाम असल्याने कारखान्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. कारखानदारांच्या या भूमिकेविरोधात ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्याने कारखानदार एकवटले आहेत. कारखानदारांचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ हे करत असून, त्यांनी जिल्ह्णातील सर्व कारखानदारांची बैठक जिल्हा बॅँकेत बोलावली आहे. यामध्ये हंगाम कधी सुरू करायचा?, ‘एफआरपी’चा गुंता कसा सोडवायचा? या दोन बाबींवर चर्चा होणार आहे. (प्रतिनिधी)


हंगाम लांबणीवर
१५ आॅक्टोबरपासून हंगाम सुरू करण्याची तयारी जिल्ह्यातील काही कारखान्यांची होती. परंतु, हादग्याच्या नक्षत्राने गेले पाच-सहा दिवस जोरदार हजेरी लावल्याने हंगाम लांबणीवर पडणार आहे.
१ नोव्हेंबरला हंगाम सुरू करायचा म्हटले तर ११ नोव्हेंबरला दिवाळी असल्यामुळे ऊसतोडणी मजूर येणार नाहीत. त्यामुळे दसऱ्यानंतर साधारणत: २२ आॅक्टोबरनंतर हंगाम सुरूच करायचा, असा प्रयत्न कारखानदारांचा आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कारखाने लवकर सुरू करणे गरजेचे होते; पण गेले चार-पाच दिवस पाऊस झाल्याने थोडे दिवस थांबावे लागणार आहे. गत हंगामाप्रमाणेच यावर्षीही साखर उद्योग अडचणीत आहे. ‘एफआरपी’चा प्रश्न व दुष्काळ यातून मार्ग काढून हंगाम सुरू करावा लागणार आहे. यावर चर्चा करण्यासाठी जिल्हा बॅँकेचा अध्यक्ष म्हणून ही बैठक बोलावली आहे.
-हसन मुश्रीफ, आमदार

Web Title: Crop season strategy with 'FRP'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.