Kolhapur- महापूर निवारण आराखडा: रस्ता-पुलाचा थाट, शेतीची लागली पुरी वाट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 12:36 PM2024-08-13T12:36:54+5:302024-08-13T12:37:24+5:30
भादोले-शिगाव रस्ता मुळावर : पूरभागात रस्ता वाढविण्याचा उद्योग कशासाठी : पाणी उतरेना, पिकांचा चिखल
शरद यादव
कोल्हापूर : संभापूर-कवठेमहांकाळ राज्यमार्ग १५३ चे काम २०२०-२१ ला करण्यात आले. यावेळी भादोले-शिगाव दरम्यान रस्त्याची उंची तब्बल पाच फुटांनी वाढविण्यात आली तसेच या पाच किलोमीटरचे पाणी जाण्यासाठी केवळ तीन फुटी सिमेंटची पाइप टाकण्यात आली. यामुळे भादोलेसह किणी, घुणकी, चावरे, जुने पारगाव, निलेवाडी या कोल्हापूर जिल्ह्यातील, तर सांगली जिल्ह्यातील शिगाव, कणेगाव, ऐतवडे या गावांतील शेती पाऊस थांबून आठवडा झाला तरी पाण्याखाली आहे.
पूरपट्ट्यात रस्ता करताना वाढविला नाही तर पूर काळात रस्ता सात ते आठ दिवस बंद राहील असे सांगितले जाते. परंतु, रस्ता बंद झाल्यास काही आभाळ कोसळणार नाही, पण ९ ते १० गावांतील पिकांचा चिखल झाला तर हजारो कुटुंबे उद्ध्वस्थ होतील याचा विचार कोण करणार.
यंदा जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती. पाऊस थांबल्यानंतर पाणी ओसरण्यास सुरुवात झाली व काही ठिकाणची पिके वाचली. मात्र, भादोले परिसरात नदीकाठच्या दोन किलोमीटर भागात बाटलीत भरल्यासारखे पाणी आहे तसेच आहे.
यंदा भादोलेजवळच्या आठ गावांत २००५, २०१९ व २०२१ पेक्षा जास्त लांबपर्यंत पुराचे पाणी आले होते. वारणा नदीतून पाणी पुढे जाण्यासाठी शिगाव-भादोले येथे रस्ता कमी ठेवणे गरजेचे होते. परंतु, येथेच रस्ता तब्बल ५ फूट वाढविला आहे. तसेच या पाच किलोमीटर परिसरातील पाणी केवळ एका सिमेंटच्या पाइपमधून पलीकडे जाईल असा विचार करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील तर शेतकरी जगणार कसा, हाच प्रश्न आहे.
कोरेगाव-भादोले दरम्यान नवा पूल कशासाठी..
भादोले ते कोरेगाव दरम्यान २०२२ साली नव्या पुलाचे काम सुरू करण्यात आले. यासाठी दहा कोटी रुपये खर्च करण्यात आला. यंदा या पुलाचे काम पूर्ण झाले. परंतु, दोन्ही गावच्या शेतकऱ्यांची मागणी नसताना केवळ शासनाचा पैसा आहे म्हणून कर खर्च, या भावनेतून पूल उभारला गेला. यंदा या पुलामुळे पुराचे पाणी तीन किलोमीटरपर्यंत पसरल्याचे दिसून येते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर पूल नाहीत तेथे पूल बांधायचे सोडून मागणी नसेल तेथे पूल बांधायचा उद्याेग बांधकाम विभागाला सुचतोच कसा...
जयंतरावांचे केवळ आश्वासन
२०२१ साली पूर पाहणी करताना तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांना भादोले येथील शेतकऱ्यांनी अडवून ठिकठिकाणी मोऱ्या बांधण्याची मागणी केली होती. जयंत पाटील यांनी यावर कामाचे आश्वासनही दिले होते; पण नंतर सरकार गेले अन् जयंतरावांचा शब्दही महापुरातून वाहूून गेला.
किणी येथील विचारे मळ्यात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात येत असून, २०१९च्या तुलनेत पाणी पातळी जास्त दिवस राहिल्याने पिके कुजून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. भविष्यात शेती करणेच अवघड झाले आहे. - राजेंद्रकुमार पाटील, किणी
काय केले पाहिजे..
- भादोले-शिगाव दरम्यान पाच ठिकाणी मोऱ्या बांधण्याची गरज
- या रस्त्याची उंची कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लगतील
- अनेक शेतकऱ्यांनी रस्त्याकडेच्या नाल्या बुजवल्या आहेत, त्या पूर्ववत करणे गरजेचे आहे.
- कोरेगाव-भादोले दरम्यान नव्या पुलाचा घाट कुठल्या बुद्धिवंतांच्या डोक्यात आला याचा शोध घ्यावा