विकासाची कोटींची उड्डाणे कागदावरच
By admin | Published: March 27, 2017 03:04 PM2017-03-27T15:04:29+5:302017-03-27T15:04:29+5:30
अंबाबाई मंदिर विकास आराखडा, चर्चा, सुचना, दुरुस्त्या, बदल
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्यांचा फेरा सात वर्षांनंतरही सुटलेला नाही. मंदिराच्या पहिल्या १२० कोटींच्या आराखड्यापासून सुरु झालेला हा प्रवास ५० कोटी, पुढे सुचना दुरुस्त्या करून २५० कोटी, पहिला टप्पा ७० कोटींचा आणि आता ९० कोटींची उड्डाणे कागदावरच झाली आहे. पहिल्या टप्प्यातील सुधारीत आराखड्याला महापालिकेचा सभेत मंजूरी मिळाली आहे. मात्र तो शासन दरबारी मंजुरी गेला की नव्या चर्चा, सादरीकरण, सुचना, बदल आणि फेरआराखडा या फेऱ्यातून करवीर निवासिनी श्री अंबाबाईची सुटका होण्याची काही सकारात्मक चिन्हे दिसेनाशी झाली आहेत.
एखाद्या देवस्थानालादेखील लालफितीच्या शासकीय कारभाराच्या दुर्देवाचा फेरा कसा लागतो याचे उत्तम उदाहरण म्हणून आता अंबाबाई मंदिर सांगता येईल. सन २०१० सालापासून सुरु झालेले आराखड्याचे फेरे सात वर्षांनंतरही थांबलेले नाहीत. साडेतीन शक्तीपीठ असलेल्या अंबाबाई मंदिराला दरवर्षी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लाखोंनी वाढ होत असताना अंबाबाई मंदिराचे जतन संवर्धन, भाविकांसाठी अन्नछत्र, यात्री-निवास पार्कींग सारख्या सोयीसुविधा निर्माण करण्यात अद्याप महापालिका आणि देवस्थान समितीला यश आलेले नाही.
केशवराव भोसले नाट्यगृहाचे नुतनीकरण २०१४ साली सुरु झाले आणि हे काम दीड ते पावणे दोन वर्षात संपले. आता दुसऱ्या टप्प्यासाठी तयारी सुरु झाली आहे. कोल्हापूर चित्रनगरी विकास कामांचा नारळ फुटून आता तेथे दिमाखात नवे भव्य सेट उभारले जात आहेत. गेल्या वर्ष दीड वर्षात बनवण्यात आलेल्या जोतिबा मंदिराच्या २५ कोटींच्या आराखड्यालाही शासनाने काही दिवसांपूर्वी मंजूरी दिली. मात्र सर्वात आधी तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार होवूनही हा प्रस्ताव अद्याप शासनाला सादरदेखील झालेली नाही.
असे झाले आराखडे
-कोल्हापूर शहराचा दोन हजार कोटींचा आराखडा
-हा आराखडा नाकारत केवळ अंबाबाई मंदिराचा १२० कोटींचा आराखडा
-१९० कोटींचा आराखडा
-आराखड्याचे टप्पे करुन ५० कोटींचा स्वतंत्र प्रस्ताव
-शहरातील रस्ते, पार्कींग, पर्यटन स्थळांचा समावेश करुन २५० कोटी
-पहिल्या टप्प्यासाठी ७२ कोटींचा आराखडा
- त्यावर दोन वर्षे फक्त चर्चा, सुचना, स्फुटणी, आॅडीट, दुरुस्त्या.
-अन्य बाबींचा समावेश करुन पहिला टप्प्याचा आराखडा ९० कोटींचा .