जिल्हा बँकेला साडेबारा कोटी नफा

By admin | Published: April 4, 2017 01:36 AM2017-04-04T01:36:47+5:302017-04-04T01:36:47+5:30

फिनिक्स भरारी : ७५ कोटींचा संचित तोटा कमी होऊन नफा : ‘सीआरएआर’ १०.२१ टक्के; लाभांशही देणार

Crores of rupees to the district bank | जिल्हा बँकेला साडेबारा कोटी नफा

जिल्हा बँकेला साडेबारा कोटी नफा

Next

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने ७४ कोटी ८१ लाखांचा संचित तोटा कमी करून १२ कोटी ४६ लाखांचा निव्वळ नफा मिळविला आहे. बॅँकेने या आर्थिक वर्षात चारशे कोटींच्या ठेवी वाढवत १०.२१ टक्के ‘सीआरएआर’ (भांडवल पर्याप्तता) राखण्यात यश मिळविले आहे. नोटाबंदी, त्यानंतर रिझर्व्ह बॅँकेने चलन पुरवठ्यात केलेला दुजाभाव व कर्जमाफीची चर्चा यामुळे बॅँकेला कोट्यवधीचा फटका बसूनही केवळ संचालक मंडळाची आर्थिक शिस्त व सचोटीच्या बळावर बॅँकेने फिनिक्स पक्षाप्रमाणे शून्यातून गगनभरारी घेण्याची कामगिरी केली आहे.
सहा वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीनंतर दोन वर्षांपूर्वी सभासद नियुक्त संचालक मंडळ कार्यरत झाले. प्रशासकांनी बॅँकेला ‘आयसीयू’मधून बाहेर काढले होते, पण धोका टळला नव्हता. २०१५-१६ मध्ये बॅँक थोडी प्रगतीपथावर आली, पण रिझर्व्ह बॅँकेने मार्च २०१७ पर्यंत ९ टक्के ‘सीआरएआर’ पूर्ण करणे बंधनकारक केले होते, अन्यथा परवान्यावर गंडांतर येणार होते. त्यामुळे २०१६-१७ या आर्थिक वर्षात नवीन कर्जपुरवठा व वसुलीवर लक्ष केंद्रित केले, पण ८ नोव्हेंबरला नोटाबंदी निर्णयाने बॅँकेपुढे पुन्हा संकट उभे राहिले. साडेतीनशे कोटींच्या नोटा बॅँकेत पडून राहिल्या, त्याचबरोबर चार महिन्यांत व्यवहार ठप्प झाले. त्यात कर्जमाफीतील ११२ कोटी पात्र असल्याच्या न्यायालयाने निकालाने हप्ते भरण्यास शेतकऱ्यांची टाळाटाळ सुरू आहे. कर्जमाफीच्या चर्चेमुळे परतफेडीवर परिणाम झाला. या सगळ्यांचा बॅँकेला किमान १५ ते २० कोटींचा फटका बसला. तरीही बॅँकेने मार्च २०१७ अखेर ८७ कोटी २७ लाखांचा नफा कमावला. त्यातून संचित तोटा वजा करता १२ कोटी ४६ लाखांचा निव्वळ नफा झाला आहे.


दहा वर्षांनंतर संस्थांना लाभांश !
बॅँक २००७-०८ मध्ये संचित तोट्यात गेल्याने तेव्हापासून संस्था सभासदांना लाभांश दिला नव्हता. गेले दहा वर्षे कोट्यवधीचे भागभांडवल जिल्हा बॅँकेत पडून राहिल्याने संस्थांना मोठा झटका बसला होता. अखेर या आर्थिक वर्षात संचित तोटा कमी होऊन बॅँक निव्वळ नफ्यात आल्याने सभासदांना किमान ५ टक्के लाभांश मिळणार आहे. सहकार खात्याची परवानगी घेऊन तो १० टक्क्यापर्यंत कसा देता येईल, याची तयारी संचालकांनी केली आहे.

तपशील२०१४-१५२०१५-१६२०१६-१७
ठेवी२८८९ कोटी ७५ लाख३२७१ कोटी ६७ लाख३६०० कोटी ६३ लाख
भागभांडवल१४६ कोटी ६९ लाख१५६ कोटी ३३ लाख१६५ कोटी ४६ लाख
येणे कर्ज२१६७ कोटी२४४९ कोटी २० लाख२५०२ कोटी ६२ लाख
एन. पी. ए.१६९ कोटी ९१ लाख१६८ कोटी १५ लाख१३८ कोटी ९२ लाख
नफ/ तोटा८ कोटी ४४ लाख (तोटा)२८ कोटी ३२ लाख (नफा)८७ कोटी २७ लाख (नफा)
संचित तोटा१०३ कोटी १३ लाख७४ कोटी ८१ लाख-
सीआरएआर७ टक्के७.२ टक्के१०.२१ टक्के

कर्मचाऱ्यांचा जल्लोषकोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचा संचित तोटा कमी होऊन १२ कोटींचा निव्वळ नफा झाल्याने कर्मचाऱ्यांनी सोमवारी बँकेच्या दारात फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला. बँक नफ्यात आल्याचा आनंद आणि त्यात अध्यक्ष हसन मुश्रीफ यांचा आज, मंगळवारी वाढदिवस आहे, पण कर्मचाऱ्यांनी सोमवारीच केक कापून बँकेत आनंदोत्सव साजरा केला.
सोमवारी सकाळी कर्मचाऱ्यांनी बँकेच्या मुख्य कार्यालयाचे प्रवेशद्वार रांगोळी व फुलांच्या माळांनी सजवले होते. बँक नफ्यात आल्याची अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी घोषणा करताच फटाक्यांची आतषबाजी करत साखर व पेढे वाटून कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, संचालक निवेदिता माने, पी. जी. शिंदे, विलास गाताडे, संजय मंडलिक, भैया माने, संतोष पाटील, अनिल पाटील, उदयानी साळुंखे, प्रतापसिंह चव्हाण, अनिल साळोखे आदी उपस्थित होते.
‘पी.जीं’नी केक भरवला!
बॅँकेच्यावतीने केक कापून मुश्रीफ यांचा वाढदिवस साजरा केला. भाजपचे संचालक पी. जी. शिंदे यांनी मुश्रीफ यांना केक भरवून शुभेच्छा दिल्या.
अप्पींची दांडी
जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीमुळे बँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील हे कमालीचे तणावाखाली आहेत. त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषदेला दांडी मारली. उपाध्यक्ष कुठे आहेत? अशी विचारणा करत निवेदिता माने यांनी संचालकांची फिरकी घेतली.

Web Title: Crores of rupees to the district bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.