कृषी प्रदर्शनात कोटीची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 11:48 PM2017-11-05T23:48:45+5:302017-11-05T23:49:38+5:30
कोल्हापूर : शेतकºयांना शेतीविषयक माहिती उपलब्ध करून देणारे माध्यम असलेल्या संजीवनी कृषी प्रदर्शनात रविवारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. शेती औजारे, ट्रॅक्टर, पॉवरट्रिलर, चारचाकी वाहने, बी-बियाणे, खते खरेदीसाठी शेतकºयांसह ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुटीचा दिवस असल्याने जिल्ह्याच्या कानाकोपºयांतून आबालवृद्ध मोठ्या संख्येने आले होते. आज, सोमवारी या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे.
येथील गांधी मैदानावर शेतकरी सहकारी संघ व राजारामबापू पाटील सहकारी दूध संघातर्फे संजीवनी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. एक टन वजनाचा कसबे डिग्रजचा बैल... एक टनाची गाडी ओढणारा कºहाड येथील ब्लॅक बुल कुत्रा... शिंगणापूरचे पाच किलोचे कोंबडे... येलूरची लांब शिंगांची १४ लिटर दूध देणारी म्हैस... दीड फूट शिंगांचा बोकड... असे आकर्षण ठरलेले पशु-पक्षी पाहण्यासाठी अक्षरश: झुंबड उडाली. त्याचबरोबर प्रदर्शनातील खाद्यपदार्थ, कृषी साहित्य, आॅटोमोबाईल, शेती औजारे, विविध कीटक व तणनाशक व बचतगटांच्या विविध वस्तूंच्या स्टॉलवर माहिती घेण्यासाठी व खरेदीसाठी झुंबड उडाली होती. यामध्ये शेती औजारे, चारचाकी वाहने, ट्रॅक्टर, पॉवरट्रिलर, शेतीपंप, खते, बी-बियाणे यांची सुमारे कोट्यवधी रुपयांची उलाढाल या प्रदर्शनात झाली. सकाळी दहापासून कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कर्नाटक सीमाभागातील शेतकरी व नागरिकांच्या गर्दीची रीघ रात्री दहापर्यंत कायम होती. गेल्या तीन दिवसांत अडीच लाखांहून अधिक लोकांनी प्रदर्शनास भेट दिली.