पाडव्याच्या मुहूर्तावर करोडोंची उलाढाल : कोल्हापूर बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 12:59 AM2018-11-10T00:59:35+5:302018-11-10T01:00:00+5:30

कोल्हापूर : दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर बाजारपेठेत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, चारचाकी, दुचाकी, फर्निचर, स्मार्टफोन खरेदीची कोटींची उलाढाल झाली. पारंपरिक खरेदी म्हणून ...

Crores turnover on the occasion of Padwa: A big crowd for shopping in Kolhapur market | पाडव्याच्या मुहूर्तावर करोडोंची उलाढाल : कोल्हापूर बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी

पाडव्याच्या मुहूर्तावर करोडोंची उलाढाल : कोल्हापूर बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी

Next

कोल्हापूर : दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर बाजारपेठेत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, चारचाकी, दुचाकी, फर्निचर, स्मार्टफोन खरेदीची कोटींची उलाढाल झाली. पारंपरिक खरेदी म्हणून तयार सोन्याचे दागिने, चांदीच्या आलंकारिक वस्तूंचीही उलाढाल तेजीत राहिली. विशेष म्हणजे सोन्याचा भाव बत्तीस हजारांच्या जवळपास पोहोचला होता; तरीही सोन्याची झळाळी काही कमी झाली नाही. दिवसभरात मुहूर्ताच्या खरेदीचा गुरुवारी (दि. ८) ग्राहकांनी मुक्तपणे आनंद लुटला.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या मुहूर्तावर खरेदी केली की घरी समृद्धी नांदते, या भावनेमुळे प्र्रत्येकजण कमी-अधिक प्रमाणात विविध वस्तूंची खरेदी करतात. यात दिवाळीकडे हिंदूंच्या सणांतील मोठा सण म्हणून बघितले जाते.
यात वर्षभर साठविलेले पैसे, बोनस, आदींमधून ही खरेदी केली जाते. वर्षभरात त्यासाठी आर्थिक नियोजन केले जाते. यातून अनेक नागरिकांनी विशेषत: महिलांनी सोन्या-चांदीची दागिने खरेदी केली. काही ज्वेलरी दुकानांत सोन्याच्या प्रत्येक खरेदी केलेल्या दागिन्यांचा विमा उतरवून दिला जात होता.

यासह एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रिज, ओव्हन, फूड प्रोसेसर, मोबाईल, होम थिएटर यासारख्या वस्तूंना अधिक मागणी होती. विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी शाहूपुरी, बिंदू चौक, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, टेंबे रोड, शाहू स्टेडियम, मंगळवार पेठ, उमा टॉकीज, आदी परिसरांत मोठ्या प्रमाणात गर्दी होती. नवीन वस्त्रे खरेदीबरोबरच चारचाकी, दुचाकी, आदी गाड्यांना मोठी मागणी होती. त्यामुळे वाहनविक्रीची दुकानेही सकाळपासूनच गर्दीने फुलली होती. त्यामुळे दुचाकी, चारचाकीची पूजा करतानाचे चित्र शहरातील विविध भागांसह ग्रामीण भागांतही पाहावयास मिळाले. या सर्व वस्तूंवर विविध वित्तीय संस्थांतर्फे आकर्षक वित्तीय साहाय्यता पुरविण्यात आली होती. मोबाईल फोन, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रिज, फर्निचर, आदींच्या खरेदीसाठी विविध योजना विक्रेत्यांनी जाहीर केल्याने त्यास ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. दुपारनंतर ही सर्व विक्रेत्यांची दुकाने रात्री उशिरापर्यंत अक्षरश: ओसंडून गेली होती.


वॉशिंग मशीन, फ्रीजची मागणी वाढली
हजारो रुपयांची खरेदी एकदम करणे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाही. त्यामुळे अनेकजणांनी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर डाउन पेमेंट भरून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी केली. विशेषत: वॉशिंग मशीन, फ्रीजला अधिक मागणी होती, अशी माहिती हेडा एंटरप्रायझेसचे योगेश हेडा यांनी दिली.

तयार सोन्या-चांदीच्या दागिन्यांना मागणी अधिक
यंदा पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचा दर जवळजवळ ३२,००० रुपये प्रतितोळा होता. तरीही चोख सोन्याबरोबरच तयार दागिन्यांच्या खरेदीलाही ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. विशेषत: चढा दर असूनही ग्राहकांनी मुहूर्ताची खरेदी म्हणून तयार दागिन्यांसह चोख सोने यांच्या खरेदीला अधिक पसंती दिली, अशी माहिती अनघा ज्वेल्सचे कुणाल लडगे यांनी दिली.

फर्निचर खरेदीही झोकात
गृहोपयोगी वस्तूंमध्ये गृहसजावटीचा महत्त्वाचा भाग म्हणून फर्निचरचा समावेश आहे. त्यामुळे पाडव्याचा मुहूर्तावर ग्राहकांनी सोफासेट, डायनिंग टेबल, आदी अद्ययावत फर्निचरला पसंती देत खरेदीचा आनंद लुटला, अशी माहिती महालक्ष्मी फर्निचरचे विजय शिंदे यांनी दिली.

मोबाईल खरेदीलाही अधिक पसंती
विविध कंपन्यांच्या ब्रँडेड स्मार्टफोन्सवर विविध वित्तीय संस्था व स्वत: विक्रेत्यांनी दिलेल्या योजनांमुळे ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात फोन खरेदी केली. यात आॅनलाईन खरेदीपेक्षा विक्रेत्यांनी दिलेल्या योजनांना ग्राहकांनी अधिक प्रतिसाद दिला, अशी माहिती एस. एस. कम्युनिकेशन अ‍ॅन्ड सर्व्हिसेसचे अतुल भांड यांनी दिली.

वाहन खरेदीही सुसाट
पाडव्याच्या मुहूर्तावर दुचाकीच्या खरेदीबरोबरच सुमारे सहाशेहून अधिक चारचाकींचीही विक्री झाली. यात स्टायलिश, आरामदायी, अत्याधुनिक गाड्यांना अधिक मागणी होती, अशी माहिती साई सर्व्हिसच्या सेल्स मॅनेजर वंदना मोहिते यांनी दिली.
 

दसऱ्याच्या तुलनेत यंदा दिवाळीच्या कपडे खरेदीला ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात ब्रँडेड कंपन्यांच्या शर्ट, ट्राऊझर्स, अशा एक ना अनेक तयार कपड्यांच्या खरेदीला युवावर्गाने पसंती दिली.
- सतीश माने, व्यंकटेश्वरा गारमेंटस

सर्वसामन्यांच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीच्या वस्तूंच्या किमतीमुळे ग्राहकांनी खरेदीचा उत्सव साजरा केला. विशेषत: ‘एकाच छताखाली’ अनेक वस्तूंच्या खरेदीला अधिक पसंती दिली.
- व्यंकटेश बडे, लकी बझार


 

Web Title: Crores turnover on the occasion of Padwa: A big crowd for shopping in Kolhapur market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.