कोल्हापुरात हवालाचे पावणेदोन कोटी जप्त

By admin | Published: September 25, 2016 01:25 AM2016-09-25T01:25:22+5:302016-09-25T01:25:22+5:30

चौघांना अटक : रक्कम शाहूपुरीतील तिघा व्यापाऱ्यांची; दाभोळकर कॉर्नर येथे कारवाई

Crores worth crores of rupees in Kolhapur seized | कोल्हापुरात हवालाचे पावणेदोन कोटी जप्त

कोल्हापुरात हवालाचे पावणेदोन कोटी जप्त

Next

कोल्हापूर : कोल्हापूरहून बंगलोरला बेहिशेबी हवालाचे १ कोटी ६७ लाख १० हजार रुपये घेऊन जाणाऱ्या चौघा तरुणांना दाभोळकर कॉर्नर येथे शुक्रवारी रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी रंगेहात पकडले.
संशयित आरोपी भरत जयंतीलाल पटेल (वय ४६, रा. वडनगर, ता. खेरालो, जि. मेहसाणा, गुजरात), प्रकाश चतुर्गिरी गोस्वामी (३६, रा. लाडोली, ता. विजापूर, जि. मेहसाणा), महेश विक्रमसिंह रजपूत-चव्हाण (२३), रमणसिंह शंकरसिंह चव्हाण उर्फ रजपूत (२५, दोघे, रा. राजारामपुरी आठवी गल्ली, मूळ रा. गिरता, ता. विजापूर, जि. मेहसाणा) अशी त्यांची नावे आहेत.
त्यांच्याकडून चार मोबाईलही हस्तगत केले. या कारवाईने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही रक्कम शाहूपुरीतील तिघा व्यापाऱ्यांची आहे. रोकड घेऊन जाणारे हे त्या कार्यालयातील कर्मचारी आहेत. व्यापाऱ्यांकडे चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, दाभोळकर कॉर्नर येथे व्ही. आर. एल. ट्रॅव्हल्सच्या जाणाऱ्या लक्झरी प्रवासी बसमधून चार तरुण अनधिकृतपणे मिळविलेली रोख रक्कम घेऊन जाणार आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दिनकर मोहिते यांना मिळाली.
त्यांनी पोलिस उपनिरीक्षक सचिन पंडित, गजेंद्र पालवे यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार दोन्ही पथके शुक्रवारी
(दि. २२) रात्री दहाच्या सुमारास पंचांसमक्ष रॉयल प्लाझा, दाभोळकर कॉर्नर येथे टेहळणी करीत असता चार तरुण आपल्या खांद्याला सॅक अडकवून आजूबाजूला संशयाने पाहत बावरलेल्या स्थितीत शर्मा ट्रॅव्हल्सच्या कार्यालयाकडे येत असताना दिसले. संशयावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी भरत पटेल, प्रकाश गोस्वामी, महेश रजपूत, रमणसिंह चव्हाण अशी नावे सांगितली. त्यांची अंगझडती घेतली असता मोठी
रक्कम मिळून आली. त्यांच्याकडे ही रक्कम कोठून आणली, कोणाची आहे.
याबाबत चौकशी केली असता शाहूपुरी येथील वेगवेगळ्या कार्यालयांतील असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना शनिवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची बिंदू चौक कारागृहात रवानगी केली. या रकमेबाबत पोलिस प्राप्तिकर विभागाशी पत्रव्यवहार करून त्यांना चौकशी करण्यासंबंधी विनंती करणार आहेत. ही रक्कम सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. (प्रतिनिधी)



 

Web Title: Crores worth crores of rupees in Kolhapur seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.