क्रौर्याचा नंगानाच, माणूसकीची झोप

By admin | Published: July 23, 2014 10:26 PM2014-07-23T22:26:28+5:302014-07-23T22:30:10+5:30

साखरोळी हत्याकांड : दरवाजे ठोठावूनही वाडीतील लोकांचा प्रतिसाद शून्य

Crow | क्रौर्याचा नंगानाच, माणूसकीची झोप

क्रौर्याचा नंगानाच, माणूसकीची झोप

Next

शिवाजी गोरे - दापोली
देवदेवस्की व प्रॉपर्टीच्या वादातून रमेश मिसाळ यांच्यावर मध्यरात्री हल्ला करण्यात आला. त्यांचा जागीच मृत्यू झाला. मोठा मुलगा रुपेश गंभीर जखमी, तर दुसरा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात घरात निपचीत पडलेला. वाचवा वाचवा म्हणत प्रणया मिसाळ वाडीतील गाडीवाल्याच्या घरी धावत गेली. परंतु गाडीवाल्याने डिझेल संपले आहे, असे सांगून दार बंद केले. वाळीत टाकलेल्या कुटुंबाला मदत करायची नाही, असा वाडीचाच अलिखित ठराव झाल्याने मिसाळ कुटुंबीयांची जीवन -मरणाची लढाई सुरू असताना वाडीतील एकही ‘माणूस’ तिकडे फिरकला नाही.
रमेश मिसाळ यांच्या कुटुंबावर गेल्या काही वर्षांपासून वाडीतील सर्व लोकांनी बहिष्कार टाकला होता. हत्याकांडने अख्खा तालुका हादरून गेल्याने यामागील कारणांचा उलगडा झालेला नाही. बहिष्कार टाकलेल्या कुटुंबाला कोणीही मदत करायची नाही, असा अलिखित ठराव झाल्याने तीन निष्पाप जीव वाचवण्यासाठी धावा करत होते, तरी त्यांना वाचवण्यासाठी गावातील कोणीही पुढे आले नाही. रमेश मिसाळची पत्नी रुचिता व रुपेश मिसाळ यांची पत्नी प्रणया या दोन्ही महिला वाडीतील प्रत्येकाचे दार ठोठावत जीव वाचवण्यासाठी लोकांकडे मदतीची याचना करत होत्या. आमच्या जखमी झालेल्या कुटुंबीयांना घेऊन दवाखान्यात चला, अशी विनवणी त्या गाडीवाल्यांकडे करत होत्या. मात्र, आपल्या गाडीतील डिझेल संपले म्हणून गावातील गाडीवाल्याने मदत नाकारली, एवढेच नव्हे तर लगेच दारही बंद करून घेतले.
वाडीत एवढा भयानक प्रकार घडूनसुद्धा इथे काही घडलेच नाही, असे भासवण्यात आले. रमेश मिसाळ यांचा मृतदेह दिवसभर उपजिल्हा रुग्णालयात होता. रुपेश व प्रफुल्ल डेरवण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.

कुटुंबावर हल्ला करणाऱ्या ७ जणांना पोलीसकोठडी
साखरोळी नं. १ हनुमानवाडी येथील रमेश मिसाळ यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला करुन एकाला ठार करून तिघांना जखमी केल्याच्या संशयावरून आरोपी सचिन मिसाळ, किरण मिसाळ, महेश शंकर मिसाळ, मीनाक्षी महेश मिसाळ, राधिका सचिन मिसाळ, सुनंदा संतोष मिसाळ व योगीता संतोष मिसाळ या सातजणांना दापोली न्यायालयात हजर केले असता दापोली न्यायालयाने सातही संशयित आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

साखरोळीतील मिसाळ कुटुंबियांवर वाडीतील लोकांनी बहिष्कार टाकला, हे खरे आहे. वाडीतील लोकं मिसाळ कुटुंबियांकडे येत-जात नाहीत. त्यांच्यातील अंतर्गत वादातून हा बहिष्कार घालण्यात आला आहे. मात्र या एकूणच प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. त्यामुळे तपास पूर्ण झाल्यानंतरच बोलणे उचित ठरेल.
- प्रमोद मकेश्वर,
पोलीस निरीक्षक

Web Title: Crow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.