रोजच भाजी खरेदीसाठी गर्दी..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:26 AM2021-05-27T04:26:14+5:302021-05-27T04:26:14+5:30
कोल्हापूर : दोन महिन्यांपासून कोरोना संसर्ग उच्चांकावर आहे, मृत्यू दर जास्त आहे, रुग्णांना बेड मिळेनात, जिल्हा, महापालिका, पोलीस प्रशासनाकडून ...
कोल्हापूर : दोन महिन्यांपासून कोरोना संसर्ग उच्चांकावर आहे, मृत्यू दर जास्त आहे, रुग्णांना बेड मिळेनात, जिल्हा, महापालिका, पोलीस प्रशासनाकडून प्रबोधन सुरू आहे, कारवाई केली जात आहे तरी काही रोज बाजारात येऊन भाजी, किराणा खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. शहरातील बाजारपेठा कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट असतानाही अगदी बेफिकिरीने नागरिकांचे आणि विक्रेत्यांचेही वर्तन असल्याचे बुधवारी शहरात दिसून आले.
राज्यासह देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना जिल्ह्यात मात्र रोज सरासरी पंधरा रुग्ण आढळत आहेत. रोज अंदाजे ५० जणांचे मृत्यू होत आहेत. या रुग्णांना सोयीसुविधा, ऑक्सिजनचा पुरवठा करताना प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांची अक्षरश: दमछाक होत आहे, तरीही ते नागरिकांचा संसर्गापासून बचाव करण्यासाठी, त्यांना योग्य उपचार मिळावेत यासाठी जीवाचे रान करत असताना दुसरीकडे नागरिक मात्र बेफिकिरीने शहरात फिरत आहेत.
आता शहरासह उपनगरात रस्त्याकडे, चौकाचौकात भाजी घेऊन विक्रेते बसलेले असतात, फळवाले असतात, सर्वत्र किराणा दुकाने आहेत; पण अट्टाहासाने लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, शिंगोशी मार्केट, गंगावेश अशा मुख्य बाजारपेठेत येऊनच लोक भाज्यांसह किराणा मालाच्या खरेदीसाठी गर्दी करत आहेत. रोज हाताला पिशवी अडकवून बाजारात येणाऱ्यांची संख्या यात मोठी आहे.
बुधवारी सकाळपासून शहरात रस्त्यांवर नागरिकांची प्रचंड वर्दळ होती. मुख्य चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी होत होती. मंडईसह किराणामालाची दुकाने बेकरी, चिरमुरे-फरसाणाच्या दुकानांसमोर गर्दीच गर्दी दिसत होती. दुपारचे बारा वाजून गेल्यानंतर ही वर्दळ कमी झाली.
---
...अन् प्रशासनाच्या नावाने खडे फोडणार
आम्ही होम क्वारंटाइन असताना सगळीकडे फिरणार, संसर्गाचे वाटप करत राहणार, बाजारपेठेत विनामास्क फिरणार, सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासत दुकानाबाहेर चिकटून उभे राहणार, विक्रेतेदेखील मास्क, हॅन्ड ग्लोव्हजशिवाय भाजी, साहित्य विकणार, वेळ जात नाही म्हणून मित्रांसोबत कट्ट्यावर गप्पा मारत बसणार, फेरफटका मारून येणार, नियमांचे पालन करणार नाही अन् रुग्ण कमी होत नाहीत म्हणून प्रशासनाच्या नावाने खडे फोडणार, लॉकडाऊन केले की आम्ही जगणार कसं, मग पॅकेज द्या म्हणणार, अशी सगळी मानसिकता आहे. एकीकडे प्रशासनाला सहकार्य करायचं नाही, त्यांचे ऐकायचं नाही आणि दुसरीकडे सगळी जबाबदारी त्यांच्यावर ढकलून मोकळं व्हायचं यामुळेच आज जिल्हा रेड झोनमध्ये असून संसर्ग कमी होत नाही; पण आमचं ऐकतंय कोण, हे प्रशासनाचे दुखणे आहे.