अंबाबाई दर्शनासाठी भाविकांची गर्दी,महाद्वारातून मुख दर्शनासाठी वर्दळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 03:36 PM2021-01-04T15:36:14+5:302021-01-04T15:40:38+5:30
Mahalaxmi Temple Kolhapur- करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी सलग दुसऱ्या रविवारी पर्यटकांनी गर्दी केली. महाद्वार खुले केल्याने मुख्य दर्शन रांगांबरोबरच मुख दर्शनासाठीही भाविकांची तितकीच गर्दी होती. तसेच मंदिराच्या आतील दुकाने सुरू झाल्याने येथेही वर्दळ होती.
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी सलग दुसऱ्या रविवारी पर्यटकांनी गर्दी केली. महाद्वार खुले केल्याने मुख्य दर्शन रांगांबरोबरच मुख दर्शनासाठीही भाविकांची तितकीच गर्दी होती. तसेच मंदिराच्या आतील दुकाने सुरू झाल्याने येथेही वर्दळ होती.
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने नाताळची सुटी साधून कोल्हापूरला पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. या सुटया रविवारपर्यंत सुरू असल्याने या दिवशीदेखील मंदिराबाहेर भाविकांच्या रांगाच रांगा दिसत होत्या. दर्शनाची वेळ आता सकाळी सहा ते रात्री आठ अशी बारा तासांची करण्यात आल्याने भाविकांसाठी ही सोयीची बाब ठरली आहे. त्यामुळे सकाळी सहा वाजायच्या आतच पूर्व दरवाज्याबाहेर रांगा होत्या.
देवस्थान समितीने शुक्रवारपासून महाद्वार भाविकांसाठी खुला केल्याने देवीच्या मुखदर्शनाासाठीही मोठी गर्दी होत आहे. भाविक महाद्वारातून येऊन कासव चौक व गणपती चौक येथून देवीचे मुखदर्शन घेऊन जात होते. त्यामुळे येथे भाविकांची मोठी वर्दळ होती.
उलाढाल वाढली
अंबाबाई मंदिर पूर्ण क्षमतेने खुले होऊन पर्यटकांची गर्दी वाढल्याचा परिणाम अर्थकारणावरही झाला आहे. येथील फुलवाल्यांपासून ते पूजेचे साहित्य, महाद्वार, जोतिबा रोडवरील फेरीवाले, इमिटेशन ज्वेलरी, हॉटेल्स, यात्री निवास, रिक्षावाले अशा सगळ्याच क्षेत्रातील व्यावसायिकांच्या अर्थकारणाला गती मिळाली आहे.