जोतिबावर भाविकांची गर्दी
By admin | Published: October 10, 2016 12:50 AM2016-10-10T00:50:28+5:302016-10-10T00:50:28+5:30
पाच कमळपुष्प पाकळ्यांत महापूजा
जोतिबा : नवरात्रौत्सवाच्या नवव्या माळेला जोतिबा देवाची पाच कमळपुष्प पाकळ्यांत महापूजा बांधण्यात आली. नवव्या माळेला रविवार असल्याने जोतिबा दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होती.
सकाळी दहा वाजता धुपारती सोहळा यमाई मंदिराकडे वाजतगाजत गेला. रविवार असल्याने जोतिबा देवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मंदिराभोवती चार-पाच पदरी दर्शनरांग ही मंदिराबाहेरील ठाकरे मिटके गल्लीपर्यंत पोहोचली होती. दर्शनरांग व्यवस्थेसाठी पोलिस, देवस्थान समिती, हक्कदार पुजारी समितीचे कर्मचारी व ज्योतिर्लिंग हायस्कूलचे विद्यार्थी तैनात होते.
अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. रात्री ज्योतिर्लिंग भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला.
जोतिबा मंदिरात सोमवारी सकाळी आठ वाजता श्रींचा पालखी सोहळा मंदिर प्रदक्षिणेसाठी निघणार आहे.
धुपारती सोहळ्याने जोतिबा, यमाई, तुकाई, भावकाई मंदिरांतील घट उठविण्याचा विधी होईल. खंडेनवमीनिमित्त शस्त्रपूजन विधी तसेच कर्पुरेश्वर तीर्थावर दिवे सोडण्याचा विधी होणार आहे.