चांदीचे वाण खरेदीसाठी कोल्हापुरातील हुपरीत राज्यातील व्यापाऱ्यांची धांदल, कोट्यवधींची उलाढाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 12:44 PM2023-08-12T12:44:28+5:302023-08-12T12:47:09+5:30
चांदीच्या जोडव्यासह इतर वाणांनाही संपूर्ण महाराष्ट्रातील सराफ बाजारपेठेतून सध्या मोठ्या प्रमाणात मागणी
तानाजी घोरपडे
हुपरी (कोल्हापूर) : चांदीच्या पावलांनी लक्ष्मी येते, अधिक मास समृद्ध करते. दर तीन वर्षांनंतर येणाऱ्या अधिक मासामध्ये विवाहित महिलांनी पायातील चांदीची जोडवी बदलण्याची हिंदू संस्कृतीत प्रथा आहे. त्यामुळे रौप्यनगरी हुपरी (ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर) मध्ये बनविल्या जात असलेल्या चांदीच्या जोडव्यासह इतर वाणांनाही संपूर्ण महाराष्ट्रातील सराफ बाजारपेठेतून सध्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे. राज्यभरातील व्यापाऱ्यांची येथे झुंबड उडाली आहे.
हुपरीत चांदी व्यवसाय करणारे पाच हजारांवर व्यापारी आहेत. देशभरातील सराफ बाजारात जाऊन दागिने पुरवठा करण्याचे काम दोन हजारांवर व्यापारी करतात. परंतु, यंदा माल कमी असल्याने खरेदीसाठी व्यापारीच हुपरीला येऊ लागले आहेत. येथील काही चांदी उद्योजक नियमितपणे जोडवी, वेढणी, बिचवा, फेरवा, मासोळी उत्पादन करीत असतात. अधिक महिन्यात बहुतांशी महिला आपल्या पायातील जोडवी एकतर बदलतात किंवा जुन्या वजनापेक्षा जास्त वजनाची जोडवी घडवून घेतात.
साधारणपणे दहा ग्रॅमपासून १०० ग्रॅमपर्यंत वजनाच्या जोडव्यांची ( एक भार ते दहा भार) मागणी असते. नक्षी, शीरमाठ, पेढामाठ अशा विविध प्रकारची जोडवी बनविली जातात. जोडव्यांबरोबरच बिचवा, वेढणींनापण मोठी मागणी आहे. सध्या बाजारपेठेत शुद्ध चांदीचा पुरवठा अल्प प्रमाणात होत असल्याने चांदीचे वाण बनविण्याला मर्यादा येत आहेत. सोनारांनी हाताने बनविलेल्या जोडव्यापेक्षा विविध डिझाइनच्या सुबक व आकर्षक जोडवी आहेत. हुपरीतून हव्या त्या डिझाइनची जोडवी मागणी देऊन बनवून घेण्याला सराफ मंडळी प्राधान्य देत आहेत.
पूर्वी सोनार लोक हाताने जोडवी घडवत होते परिणामी उत्पादन कमी तर होतच होते; पण नक्षीकामालाही मर्यादा यायची. ही अडचण लक्षात घेऊन येथील उद्योजकांनी जोडवी बनविण्यासाठी आधुनिक मशिनरीची जोड देऊन वेगवेगळ्या डिझाइनची व्हरायटी बाजारात आणली आहे. - अरविंद पारगावे, जोडवी, वेढणी उत्पादक हुपरी.
मागील अधिक मास कोरोनात आला होता. त्यामुळे कुणाला हौस करता आली नव्हती. यावेळचा अधिक मास तब्बल पाच वर्षांच्या कालावधीनंतर आल्यामुळे हुपरीतील चांदीच्या जोडाव्यासह सर्वच वाणांना चांगली मागणी आहे. - संजय सदाशिव माने, संचालक, कोल्हापूर जिल्हा सराफ संघ