CoronaVirus Lockdown : किराणा, मेडिकल आणि बँकांसमोर गर्दी -रस्त्यावर तुरळक वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 04:34 PM2020-03-30T16:34:46+5:302020-03-30T16:37:43+5:30
कोरोनाचे दोन रुग्ण आणि संचारबंदीमुळे सोमवारी कोल्हापुरातील रस्ते सुनसान झाले होते. किराणा मालाचे दुकान, मेडिकल आणि बँकांसमोरील रांगा वगळता शहरातील रस्त्यांवर तुरळक वाहने पाहायला मिळाली. लक्ष्मीपुरी बाजारपेठेत सर्वाधिक वर्दळ होती.
कोल्हापूर : कोरोनाचे दोन रुग्ण आणि संचारबंदीमुळे सोमवारी कोल्हापुरातील रस्ते सुनसान झाले होते. किराणा मालाचे दुकान, मेडिकल आणि बँकांसमोरील रांगा वगळता शहरातील रस्त्यांवर तुरळक वाहने पाहायला मिळाली. लक्ष्मीपुरी बाजारपेठेत सर्वाधिक वर्दळ होती.
कोल्हापुरात एकही रुग्ण नव्हता तोपर्यंतची स्थिती आणि आता दोन रुग्ण आढळल्यानंतरचे शहरातील चित्र यात मोठा फरक आढळला. कोल्हापूर सुरक्षित आहे, या भावनेने बाजारपेठा आणि रस्त्यांवर बऱ्यापैकी गर्दी होती. लोक मास्क लावून फिरायचे. मात्र, मंगळवार पेठेतील भक्तिपूजानगरमध्ये आधी एक आणि आता दुसरा कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने कोल्हापूरकरांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे संचारबंदीचे काटेकोरपणे पालन होत असल्याचे पाहायला मिळाले. नागरिकांनी स्वत:हून आपल्या आरोग्याची काळजी घेत घरात बसणे पसंत केले.
सोमवारी सकाळी दुधासह जीवनावश्यक साहित्य खरेदीसाठी काही प्रमाणात लोक घराबाहेर पडले. दुपारी बाराच्या दरम्यान मध्यवर्ती परिसरातील लक्ष्मीपुरी बाजारात किराणा माल खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ दिसली. येथे अर्ध्याहून अधिक व्यावसायिकांनी दुकाने बंदच ठेवली आहेत. उर्वरीत दुकाने अर्धवट सुरू होते, त्यामुळे या दुकानांसमोर ठरावीक अंतरावर उभे राहून लोक साहित्यांची खरेदी करीत होते. शहरातील या भागात सर्वाधिक वर्दळ दिसून आली.
अंबाबाई मंदिर परिसर, शिवाजी पेठ, रंकाळा, बाबूजमाल, गंगावेश, पापाची तिकटी या परिसरात शब्दश: शुकशुकाट होता. मोजकी माणसं रस्त्यावर फिरत होती. कपिलतीर्थ मंडई बंद असल्याने भागातील ठिकठिकाणी, झाडाखाली भाजी विक्रेते बसले होते.
राजारामपूरीत मेन रोडसह अंतर्गत रस्त्यांवरील मेडिकल समोर गर्दी होती, मात्र श्रीराम हायस्कूलच्या रोडवर ठरावीक अंतरावर भाजी विक्रेते बसल्याने येथे खरेदीसाठी महिला, पुरूष आले होते. अन्य दुकाने बंदच होती. शाहूपुरीतदेखील हीच स्थिती होती. वाहनांची तुरळक रेलचेल वगळता रहिवासी भागात शांतता होती.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी ..पोलीस
सध्या शहरच थांबलेले असल्याने ठिकठिकाणी महापालिकेचे सफाई कर्मचारी, पाण्याच्या पाईपलाईनची गळती, यासह विविध प्रकारच्या सेवा देणाºया कर्मचाऱ्यांची बºयाच ठिकाणी कामे सुरू होती. तर चौका-चौकात पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते.
उपनगरात डोकेदुखी
शहरी भागात नागरिकांची वर्दळ नसली तरी उपनगरे व परिसराला जोडून असलेल्या ग्रामपंचायतींच्या ठिकाणी असलेल्या मोकळ््या जागांमध्ये सायंकाळी तरुणांची खेळण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. कॉलन्यांच्या आतील भागात असलेल्या मैदानांवर मुलांवर फिरायला येणाºयांचेही मोठे प्रमाण आहे. त्यामुळे या भागात सायंकाळी दुचाकी वाहनावरून पोलिसांनी गस्त घालायला सुरुवात केली आहे. पोलीस कॉलन्यांमध्ये फिरून माईकवरून नागरिकांना घरात बसण्याचे आवाहन करीत होते.