corona virus Kolhapur : वीकेंड लॉकडाऊननंतर खरेदीसाठी झुंबड, वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 08:14 PM2021-06-14T20:14:32+5:302021-06-14T20:17:37+5:30
corona virus Kolhapur : वीकेंड लॉकडाऊननंतर सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी शहर गर्दीने फुलून गेले होते. लक्ष्मीपुुरी, राजारामपुरी, महाद्वार रोड, ताराबाई रोड, अंबाबाई मंदिर परिसरात विविध वस्तूंच्या खरेदीसाठी झुंबड उडाली होती. दुपारी एकपर्यंत शहरातील प्रमुख चौकांत आणि रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत राहिली.
कोल्हापूर : वीकेंड लॉकडाऊननंतर सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी शहर गर्दीने फुलून गेले होते. लक्ष्मीपुुरी, राजारामपुरी, महाद्वार रोड, ताराबाई रोड, अंबाबाई मंदिर परिसरात विविध वस्तूंच्या खरेदीसाठी झुंबड उडाली होती. दुपारी एकपर्यंत शहरातील प्रमुख चौकांत आणि रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत राहिली.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सरकारने वीकेंडला म्हणजे शनिवारी, रविवारी लॉकडाऊन कायम राखला. इतर दिवशी सोमवार ते शुक्रवारी सकाळी सात ते सायंकाळी चारपर्यंत अत्यावश्यक सेवा आणि वस्तू विक्रीची दुकाने सुरू करण्यास मुभा आहे.
दोन दिवसांच्या निर्बंधानंतर शहरातील अनेक दुकाने सोमवारी सकाळी सात वाजता चालू झाली. सकाळी दहानंतर बाजारपेठेत गर्दीला सुरुवात झाली. ती दुपारी एकपर्यंत राहिली. बिंदू चौक परिसर, लक्ष्मीपुरी बकरी बाजार, भाजी मंडई, पापाची तिकटी, शिवाजी चौक, ताराबाई रोड, गांधीनगरमध्ये खरेदीची झुंबड उडाली होती.
दुचाकी, चारचाकी घेऊन अनेकजण खरेदीसाठी घराबाहेर पडताना दिसत होते. लक्ष्मीपुरीतील भाजी आणि फळ मार्केटमध्ये अक्षरश: झुंबड उडाली होती. येथे काही काळ सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे चित्र होते. वाहतूक आणि महापालिकेचे कर्मचारी येथे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करीत होते. पण दुपारी एकपर्यंत गर्दी कायम राहिली.
आठवड्याचा पहिला दिवस असल्याने सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांसमोरही गर्दी झाली होती. ज्येष्ठ नागरिक पेन्शन व इतर कामांसाठी मोठ्या संख्येने आले होते. त्यांच्यासाठी काही बँकांनी दारात मंडप उभारून खुर्चीची व्यवस्था केली होती. तरीही बँकांसमोर अभ्यागतांची आणि ज्येष्ठ नागरिकांची रांग लागलेल्या दिसत होते.