मलकापुरात प्रतिबंधित क्षेत्रातही नागरिकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:24 AM2021-05-08T04:24:03+5:302021-05-08T04:24:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुका महसूल प्रशासनाने मलकापूर शहर हे प्रतिबंधित क्षेत्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुका महसूल प्रशासनाने मलकापूर शहर हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. असे असले तरी प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांनी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडविला आहे. खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची तोबा गर्दी होत असते. या गर्दीकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर मोठी प्रमुख बाजारपेठ आहे. मलकापूर शहरात रुग्णसंख्या ३० च्या पुढे गेली आहे, तर मृत्यूच्या काही घटनाही घडल्या आहेत. शहरात वाढणारी गर्दी याला अटकाव घालण्यासाठी पालिका प्रशासनाने घेतलेली भूमिका कुचकामी ठरत असून, शहरातील वाढत्या गर्दीला अटकाव घालण्यासाठी पालिका प्रशासनाचे नेमके नियोजन काय आहे, अशी चर्चा होत आहे.
महसूल प्रशासनाने मलकापूर शहर हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. सुरुवातीचे चार दिवस वगळता या प्रतिबंधित क्षेत्राच्या आदेशाला केराची टोपलीच दाखविण्यात आली आहे. शहरात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, याचे गांभीर्य प्रशासनाने घेऊन शहरातील गर्दीला अटकाव घालण्यासाठी खाजगी सुरक्षाही तैनात केली आहे. मात्र, सारे काही आलबेल असल्याचे जाणवत आहे.
फोटो ०७ मलकापूर गर्दी
मलकापूर शहरात खरेदीसाठी नागरिकांनी केलेली गर्दी. परिणामी, ‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा उडत आहे.