लसीकरणाकरिता नागरिकांची गर्दी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:17 AM2021-07-10T04:17:50+5:302021-07-10T04:17:50+5:30
कोल्हापूर : लसीकरण आणि गर्दी हे आता समीकरणच होऊन गेले असल्याचे प्रत्यंतर शुक्रवारी आले. महानगरपालिकेमार्फत सुरु असलेल्या लसीकरण केंद्रावर ...
कोल्हापूर : लसीकरण आणि गर्दी हे आता समीकरणच होऊन गेले असल्याचे प्रत्यंतर शुक्रवारी आले. महानगरपालिकेमार्फत सुरु असलेल्या लसीकरण केंद्रावर सलग दुसऱ्या दिवशी गर्दी झाल्याचे पहायला मिळाले. लसीकरणातील गोंधळ काही केल्या संपत नाही हेही पहायला मिळाले. ज्यांनी दुसरा डोस घेतला आहे, त्यांना महापालिकेने फोन करुन आश्चर्याचा धक्काच दिला.
लसीकरणात गेल्या दोन दिवसापासून मोठा गोंधळ उडाला आहे. लस घेणाऱ्यांची संख्या आणि त्याच्या बदल्यात उपलब्ध होणारी संख्या याचा मेळ घालताना महानगरपालिका प्रशासनाची दमछाक होत आहे. ८४ दिवस पूर्ण झाल्यामुळे नागरिक लस घेण्याबाबत आग्रही आहेत. आपणास लस मिळावी म्हणून काही केंद्रावर पहाटे पाच वाजल्यापासून नंबर लावले जात आहेत. नागरिक स्वयंशिस्तीने जसे येतात तसे नंबर नोंदविले जातात. पण जेव्हा आरोग्य केंद्रातील कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी येतात तेव्हा ते काही तरी वेगळेच सांगून रांगेत उभे राहिलेल्यांना घरी जाण्यास सांगत आहेत. त्यामुळे वादावादीचे प्रकारही घडताना दिसत आहेत.
शुक्रवारी फिरंगाई आरोग्य केंद्रातून काही नागरिकांना दुसरा डोस घेऊन काही दिवस उलटल्यानंतरही लस घेण्यास या असे निरोप दिले. त्यामुळे असे फोन आलेल्या नागरिकांना धक्काच बसला. काही दिवसापूर्वी लस घेऊनही त्यांची नोंद झालीच नव्हती हे अशा फोनवरुन स्पष्ट झाले. अनेक केंद्रातून काही व्यक्तींना तुम्ही जेथे पहिला डोस घेतला तेथेच दुसरा डोस घ्या, असे सल्ले दिले जात होते.
नियोजनातील हा गोंधळ लक्षात आल्यानंतर आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांना अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी लागली. त्यामुळे यापुढे तरी लसीकरणात योग्य नियोजन होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महापालिकेकडील लसीचा साठा संपल्यामुळे शनिवार व रविवारी लसीकरण थांबविण्यात आले आहे. सोमवारी ( दि.१२जुलै) ४५ वर्षे व त्यावरील नागरिकांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात येणार आहे. तर आज, शनिवारी सायंकाळी पाच वाजता नागरिकांना ऑनलाईन स्लॉट बुकिंग करता येणार आहे. शुक्रवारी कोविशिल्डचा पहिला डोस २४ व दुसरा डोस २,६६० नागरिकांना देण्यात आला.
फोटो क्रमांक - ०९०७२०२१-कोल- लसीकरण
ओळ - कोल्हापूर महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले नागरी आरोग्य केंद्रावर शुक्रवारी लसीकरणास अशी रांग लागली होती. छाया : आदित्य वेल्हाळ