महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरांत भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 02:32 PM2020-02-21T14:32:19+5:302020-02-21T14:40:33+5:30
भगवान शंकराच्या आराधनेतील महत्त्वाचा दिवस असलेली महाशिवरात्री आज, शुक्रवारी सर्वत्र साजरी होत आहे. यानिमित्त शहरातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांची शिवदर्शनासाठी गर्दी झाली होती.
कोल्हापूर : भगवान शंकराच्या आराधनेतील महत्त्वाचा दिवस असलेली महाशिवरात्री आज, शुक्रवारी सर्वत्र साजरी होत आहे. यानिमित्त शहरातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांची शिवदर्शनासाठी गर्दी झाली होती.
श्री शिवशंकराच्या आराधनेत सोमवार, श्रावण सोमवार हे दिवस महत्त्वाचे मानले जातात. मात्र या सगळ्यांत महाशिवरात्री या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वर्षभर एकही उपवास न करणाऱ्या व्यक्तीदेखील महाशिवरात्रीला व्रतस्थ राहतात. मध्यरात्री बारा वाजेपर्यंत देवाची उपासना केली जाते. कोल्हापूर हे शिवशक्तीचे स्थान मानले जाते; त्यामुळेच येथे शिवमंदिरांची संख्यादेखील जास्त आहे.
शिवाजी पेठेतील चंद्रेश्वर गल्लीतील शिवमंदिरातही विशेष पूजा बांधण्यात आली. फुलांनी सजविलेल्या श्रींच्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला. ही पूजा प्रथमेश सरनाईक, शुभम साळुंखे, रोशन जोशी, उमेश जाधव यांनी बांधली.
गंगावेशेतील ऋणमुक्तेश्वर मंदिर तालीम मंडळाच्या वतीने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे श्रींच्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला. त्यानंतर विशेष पूजा बांधण्यात आली.
निवृत्ती चौक येथील निवृत्ती तरुण मंडळाच्या वतीनेही उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी साडेसात वाजता श्री ब्रह्मेश्वरास लघुरुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर भाविकांना दूध, खिचडी व केळ्यांचे वाटप करण्यात आले. दिवसभरात चित्रकला, निबंध, संगीत खुर्ची, वक्तृत्व, वेशभूषा, नृत्य अशा विविध स्पर्धा होतील.
मंगळवार पेठेतील रावणेश्वर मंदिरालाही आकर्षक सजावट करण्यात आली आहे. याशिवाय कैलासगडची स्वारी मंदिर, अंबाबाई मंदिर परिसरातील अतिबलेश्वर, वटेश्वर, कपिलेश्वर, उत्तरेश्वर या शिवमंदिरांमध्येही धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तन, प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे.