बाजारात गर्दी आणि कोरोनाची भीती कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:24 AM2021-05-13T04:24:42+5:302021-05-13T04:24:42+5:30
कोल्हापूर : कडक लॉकडाऊन होणार असल्याच्या शक्यतेमुळे शहरातील बाजारपेठेतील नागरिकांची गर्दी आणि या गर्दीमुळे होणारा कोरोनाचा संसर्ग याची भीती ...
कोल्हापूर : कडक लॉकडाऊन होणार असल्याच्या शक्यतेमुळे शहरातील बाजारपेठेतील नागरिकांची गर्दी आणि या गर्दीमुळे होणारा कोरोनाचा संसर्ग याची भीती बुधवारी देखील कायम होती. रुग्णांना बेड मिळत नाहीत, रुग्णालयांना ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. तरीही नागरिक बाजारात गर्दी करत आहेत. नागरिकांची ही निष्काळजी संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शहरातील बाजारपेठेतून खरेदीसाठी गर्दी वाढत आहे. जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरिक दुकानांच्या दारात मोठ्या रांगा लावत आहेत. सकाळी सात ते अकरा या वेळेतच ही दुकाने सुरू असल्यामुळे ही एकाचवेळी गर्दी दिसत आहे. कडक संचारबंदी, लॉकडाऊन, नियमांची कडक अंमलबजावणी करणार, असे जिल्हा प्रशासनाने जाहीर करूनही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. विशेष म्हणजे चौका-चाैकात पोलीस दिसतात. परंतु तेही लायसन, ओळखपत्र आहे का विचारतात आणि सोडून देतात. कारवाई काहीच होत नसल्याने शहरातील गर्दी वाढतच चालली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील बाजारपेठांत आसपासच्या पाच-सहा जिल्ह्यांतून मालाची आवक-जावक होत असते. त्यामुळे सकाळच्या वेळी लक्ष्मीपुरी धान्य बाजार किंवा मार्केट यार्ड येथे अनेक वाहने येतात. व्यापारी, दुकानदार, ग्राहक येतात. त्यामुळे नियम कडक असूनही ते शिथिल होताना पाहायला मिळत आहे. भाजी विक्रेत्यांना प्रत्येक भागात जाऊन दारोदारी भाजी विक्रीची, तर दुकानदारांना घरपोच सेवा देण्याची परवानगी दिली होती. परंतु भाजी विक्रेत्यांनी भाजी मंडईच्या शेजारील रस्त्यावरच बसून भाजी विकण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळेच विशिष्ट ठिकाणीच गर्दी असलेली दिसते.
बुधवारी दुपारी दोन-अडीचनंतर उन्हाचा ताव वाढेल तशी रस्त्यावरील गर्दी कमी होती. सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतर पोलीस रस्त्यावर आले होते. चौका-चौकात रस्त्यावरून फिरणाऱ्या नागरिकांना अडवून त्यांची चौकशी करत होते. परंतु कारवाई मात्र काहीच करत नव्हते. कारवाई होत नाही म्हटले की रस्त्यावर गर्दी होते. गेल्या तीन-चार दिवसांपासून ही गर्दी वाढतच चालली आहे.