Navratri2022: अंबाबाईच्या दर्शनासाठी इतिहासात पहिल्यांदा उच्चांकी गर्दी, आठ लाख भाविकांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 01:34 PM2022-10-03T13:34:13+5:302022-10-03T13:37:33+5:30
एवढे दिवस भवानी मंडपातच रांगा फिरविल्या जायच्या, पण रविवारी भाऊसिंगजी रोड आणि शिवाजी पुतळ्यापर्यंत तीन चार रांगा लागल्या होता.
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सव आणि रविवारचा योग साधत अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदा उच्चांकी गर्दीचा विक्रम गेला. रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७ लाख ७२ हजार ७२१ इतक्या भाविकांची नोंद झाली. पहाटे २ वाजल्यापासून मुख्य दर्शन रांग लागायला सुरुवात झाली आणि ८ वाजताच या रांगा मध्यवर्ती छत्रपती शिवाजी पुतळ्यापर्यंत गेल्या. दुपारी तीन वाजेपर्यंत शिवाजी चौकातून तर सायंकाळी भवानी मंडपातील रांगाही कमी झाल्या नव्हत्या.
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवात रविवार हा ऐतिहासिक आणि सुवर्णक्षण देणारा दिवस ठरला. देवीच्या दर्शनाच्या ओढीने लाखो भाविक कोल्हापुरात दाखल झाले आणि अंबा माता की जयचा गजर झाला. आजवरच्या कोणत्याही नवरात्रोत्सवात एवढी उच्चांकी गर्दी झाली नव्हती. दिवसात जास्तीतजास्त ४ लाखांपर्यंत भाविकांची नोंद व्हायची, पण रविवारी तब्बल ८ लाख भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. एवढे दिवस भवानी मंडपातच रांगा फिरविल्या जायच्या, पण रविवारी भाऊसिंगजी रोड आणि शिवाजी पुतळ्यापर्यंत तीन चार रांगा लागल्या होता. एवढे दिवस शिवाजी पुतळा ते भवानी मंडप या रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी खुली असायची, पण रविवारी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करावा लागला.
सायंकाळी तुलनेने गर्दी कमी झाली आणि रांगा भवानी मंडपात येऊन स्थिरावल्या. रात्रीचा पालखी सोहळा होईपर्यंत ही दर्शन रांगही कमी झाली नव्हती.
पहाटे २ पासून रांगा
अंबाबाईचा शनिवारचा पालखी सोहळा झाल्यानंतर, मध्यरात्री दोन वाजता देवस्थानचे अधिकारी व कर्मचारी मंदिराला कुलूप लावून जात होते. त्यावेळी परस्थ भाविकांनी मुख्य दर्शन रांगेत जात होते. त्यानंतर, हळूहळू रांगा वाढतच गेल्या आणि सकाळी ८ वाजताच रांग शिवाजी पुतळ्यापर्यंत गेली. दुपारी ३ वाजेपर्यंत येथे रांगा लागत होत्या. त्यानंतर, हळूहळू रांगा भवानी मंडपापर्यंत आल्या.
हरवले-सापडले
गर्दीमुळे अनेक भाविकांची आपल्या नातलगांशी चुकामुक होत होती. त्यामुळे दक्षिण दरवाज्यासमोरील पोलीस कंट्रोल रूम आणि मंदिर आवारातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाकडे भाविक आपल्या नातलगांचे नाव जाहीर करण्यासाठी येत होते. तीन लहान मुलेही हरवली होती, पण नाव पुकारल्यानंतर पालक नातेवाइकांची भेट होत होती.