पुन्हा फुलली फुटबॉल पंढरी, दोन वर्षानंतर सामने पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमींची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 05:53 PM2022-03-03T17:53:42+5:302022-03-03T18:01:46+5:30
कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षापासून फुटबॉल हंगाम झाला नाही
कोल्हापूर : राज्य सरकारने कोल्हापूरसह १४ जिल्हे निर्बंधमुक्त केले आहेत. त्यात क्रीडा क्षेत्राचाही समावेश आहे. आज, गुरुवारपासून फुटबॉल सह सर्वच खेळाचे सामने पाहण्यास क्रीडा रसिकांना खुले करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. त्यामुळे के. एस. ए. लीग फुटबॉल स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमींनी गर्दी केली होती.
कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षापासून फुटबॉल हंगाम झाला नाही. स्थानिक प्रशासनाने सामने खेळविण्यात परवानगी दिल्यानंतर २२ फेब्रुवारी पासून के. एस. ए. लीग फुटबॉल हंगामाला सुरुवात झाली. मात्र यावेळी प्रक्षेकांना मैदानात बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे सामने सुरु होवून देखील क्रीडाप्रेमीमध्ये नाराजी होती. सामने सरु झाले तेव्हा पहिल्याच सामना पाहण्यासाठी अनेकांनी मैदाना शेजारील इमारतीवरुन सामना पाहिला.
दरम्यान, गुरुवारी कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने राज्य सरकारने काल, बुधवारी कोल्हापूरसह १४ जिल्हे निर्बंधमुक्त केले. याबाबत जिल्हा प्रशासनाने क्रीडा क्षेत्रही पूर्णक्षमतेने सुरु करण्यास परवानगी दिली. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिशननेही सामने पाहण्यास सर्वांना खुले करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोल्हापूरची फुटबॉल पंढरी अर्थात छत्रपती शाहू स्टेडियम पुन्हा एकदा फुटबॉल प्रेमींनी बहरले.