लस संपली तरीही केंद्राबाहेर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:24 AM2021-04-24T04:24:23+5:302021-04-24T04:24:23+5:30

कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधात्मक लस संपल्यामुळे शुक्रवारी शहरातील महानगरपालिकेच्या अकरा लसीकरण केंद्रांवर नागरिकांना ताटकळत थांबावे लागले. नागरिकांना लस संपल्याची ...

Crowds outside the center even after the vaccine ran out | लस संपली तरीही केंद्राबाहेर गर्दी

लस संपली तरीही केंद्राबाहेर गर्दी

Next

कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधात्मक लस संपल्यामुळे शुक्रवारी शहरातील महानगरपालिकेच्या अकरा लसीकरण केंद्रांवर नागरिकांना ताटकळत थांबावे लागले. नागरिकांना लस संपल्याची सूचना देऊनही, केंद्राबाहेर ती येईल, या अपेक्षेत ते बसून हाेते. शिल्लक असणारे काही डोस दिले आणि केंद्राचे काम संपविण्यात आले.

गुरुवारी दुपारनंतर शहरातील बहुतांशी लसीकरण केंद्रे बंद होती. किरकोळ चाळीस-पन्नास डोस होते, ते आलेल्या रुग्णांना शुक्रवारी सकाळी देण्यात आले. त्यानंतर दिवसभर केंद्रे बंद ठेवावी लागली. लस येईल या अपेक्षेने सकाळी लवकर नंबर लावून ठेवलेले नागरिक दिवसभर केंद्रावर जाऊन चौकशी करत होते. काहींनी तर केंद्राबाहेर ठिय्याच मांडला होता. परंतु सर्वांना निराश होऊन परतावे लागले.

प्रमिलाराजे रुग्णालयात लस मिळेल या अपेक्षेने तेथे सकाळपासून प्रचंड गर्दी उसळली होती. तीन-तीन तास नागरिक रांगेत थांबून होते. दिवसभरात तेथे ३३६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शहरात ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांवर व खासगी हॉस्पिटलमध्ये मिळून एकूण १०२१ नागरिकांना लसीकरण करण्यात आले.

नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे २३, फिरंगाई येथे ५०, राजारामपुरी येथे ४९, कसबा बावडा येथे ४०, महाडिक माळ १०९, आयसोलेशन येथे ३७, फुलेवाडी येथे ५९, सदरबाजार येथे ७२, सिद्धार्थनगर येथे १९, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र मोरेमानेनगर येथे २७, सीपीआर येथे ३३६ व उर्वरित खासगी हॉस्पिटलमध्ये २०२ इतक्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

महापालिका हद्दीतील आतापर्यंतचे लसीकरण-

- १ लाख ०२ हजार ६९० नागरिकांना पहिला डोस.

- १७ हजार १८८ नागरिकांना दुसरा डोस.

- आज कोविशिल्ड बंद, कोव्हॅक्सिन लसीकरण सुरू -

कोविड-१९ चा उपलब्ध लस साठा पाहता, शनिवारी सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रे येथे कोविशिल्ड लस उपलब्ध नसल्याने पहिला व दुसरा डोसचे लसीकरण बंद राहणार आहे. तसेच प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले, फिरंगाई, राजारामपुरी, कसबा बावडा, महाडिक माळ, फुलेवाडी, सिध्दार्थनगर, मोरे मानेनगर येथे कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस चालू राहणार आहे. सीपीआर हॉस्पिटल येथे कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस तसेच कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण चालू राहणार आहे.

खासगी रुग्णालयात लसीकरण -

याशिवाय मान्यताप्राप्त खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड-१९ लस उपलब्ध असून २५० रुपये इतके नाममात्र शुल्क देऊन लसीकरण करून घेता येईल. यामध्ये डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, ओमसाई आँकॉलॉजी हॉस्पिटल, अंतरंग हॉस्पिटल व गंगाप्रसाद हॉस्पिटल येथे लसीकरण सुरू राहणार आहे.

-फोटो देत आहे-

Web Title: Crowds outside the center even after the vaccine ran out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.