राज्यातील ग्रामीण रुग्णालयांत 'सीटी स्कॅनिंग'ची सुविधा मोफत मिळणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 11:41 AM2022-02-11T11:41:11+5:302022-02-11T11:41:44+5:30
स्कॅनिंगची सुविधा मोफत मिळणार आहे. सर्वसामान्यांना त्यांच्या घराजवळ आरोग्य सेवा, ही संकल्पना
कोल्हापूर : राज्यातील पन्नास ते शंभर खाटांच्या ग्रामीण रुग्णालयांत सीटी स्कॅन, तर उपजिल्हा रुग्णालयामध्ये एमआयआरची सुविधा येत्या दोन महिन्यात उपलब्ध करून दिली जाईल. त्यामध्ये सर्वांना स्कॅनिंगची सुविधा मोफत मिळणार आहे. सर्वसामान्यांना त्यांच्या घराजवळ आरोग्य सेवा, ही संकल्पना आहे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी येथे केले.
गोकुळ शिरगाव येथील कोल्हापूर कॅन्सर सेंटरमधील नव्या वर्सा एचडी मोझॅक-तीन तंत्रज्ञान रेडिएशन थेरपी मशीनचे लोकार्पण आणि गडहिंग्लज येथील हत्तरकी हॉस्पिटलमधील ऑन्कोप्राईम कॅन्सर सेंटरचे डिजिटल उद्घाटन मंत्री टोपे यांच्याहस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. आमदार पी. एन. पाटील, राजेश पाटील, प्रकाश आवाडे, जयंत आसगावकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, उद्योगपती व्ही. बी. पाटील, माजी नगरसेवक आदिल फरास, कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे सीएमडी डॉ. सूरज पवार प्रमुख उपस्थित होते.
कोल्हापूर कॅन्सर सेंटर हे गरीब रुग्णांचा आधार आहे. या सेंटरद्वारे ग्रामीण भागात घरोघरी जाऊन कॅन्सरबाबत प्रबोधन, निदान करण्याचा ‘होप एक्स्प्रेस’चा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. वेगाने वाढणाऱ्या कॅन्सरचे प्रमाण कमी करण्यासाठी त्याचे निदान लवकर होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने ‘होप एक्स्प्रेस’ उपयुक्त असल्याने प्रत्येक जिल्ह्यासाठी नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत अशी एक्स्प्रेस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री टोपे यांनी सांगितले.
कोरोनाकाळात मंत्री टोपे यांनी सर्वांना आत्मविश्वास दिला. कॅन्सर निदानाबाबत कोल्हापूरचे पाऊल पुढे पडण्यासाठी ‘एसडीजी’ची सुविधा येथे शासनाने उपलब्ध करून द्यावी. कॅन्सर निदानाचा महात्मा फुले योजनेत समावेश करावा, असे आमदार आवाडे यांनी सांगितले.
चंदगड तालुक्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरेसे मनुष्यबळ, तर ट्रॉमा केअर सेंटरसाठी निधी देण्याची मागणी आमदार राजेश पाटील यांनी केली. डॉ. पवार यांनी प्रास्ताविक केले. सर्व रुग्णांना चांगली आरोग्यसेवा देण्याचे आमचे ध्येय आहे. देशातील पहिल्या ‘वर्सा एचडी’ने रेडिएशन थेरपी अधिक वेगवान, प्रभावी, अचूक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. हत्तरकी हॉस्पिटलचे संचालक डॉ. रवींद्र हत्तरकी यांनी गडहिंग्लजमधील ऑन्को प्राईम सेंटरची माहिती दिली.
यावेळी डॉ. योगेश अनाप, किरण बागुल, पराग वाटवे आदी उपस्थित होते. ‘कोल्हापूर सेंटर’चे विश्वस्त डॉ. संदीप पाटील यांनी आभार मानले. चारुदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
शासनाला चांगला मार्गदर्शक मिळाला
कॅन्सरबाबत उपाययोजना करण्यासाठी शासनाला आज डॉ. सूरज पवार यांच्या माध्यमातून चांगला मार्गदर्शक, तर मला मित्र मिळाला. कॅन्सर रुग्णांच्या सेवेसाठी डॉ. पवार यांनी मिशन मोडमध्ये काम केले असून त्यांनी स्वत:चे पवार टेक्निक निर्माण केले आहे. त्यांचे नाव शासनाच्या ‘थिंक टँक’मध्ये घेणार असल्याचे मंत्री टोपे यांनी सांगितले.
आरोग्य विभागाने कात टाकली
हुडकोने आरोग्य विभागाला चार हजार कोटींचे कर्ज मंजूर करून त्यातील एक हजार कोटींचा पहिला हप्ता दिला आहे. त्यातून राज्यातील ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयांचे बांधकाम, विस्तारीकरण, अद्ययावतीकरण केले जाणार आहे. आरोग्य विभागाने कात टाकली आहे. १८०० मेडिकल ऑफिसर नियुक्त केले असून सात हजार पॅरामेडिकल स्टाफ, तंत्रज्ञांची भरती केली जाणार असल्याचे मंत्री टोपे यांनी सांगितले.
आरोग्यमंत्री टोपे म्हणाले
- ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आशा सेविकांना कॅन्सरचे निदान करण्याबाबतचे प्रशिक्षण देण्याचा विचार
- कॅन्सर निदानासाठी एसडीजी महत्त्वाचे आहे. त्यासाठी राज्यात दोन सायक्लोट्रोन प्रोजेक्ट ‘पीआयपी’ अंतर्गत राबविण्यासाठी पाठपुरावा करणार
- चंदगड, गडहिंग्लजमधील ग्रामीण रुग्णालयांना पुरेसे मनुष्यबळासह ट्रॉमा केअर सेंटरसाठी लवकरच टोकन रक्कम देणार
- इचलकरंजीतील आयजीएमचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार आहे. तेथील कामात झारीतील शुक्राचार्यांकडून निर्माण केलेली अडचण सोडविणार