पालमध्ये चाऱ्यासाठी ऊस कापला; जनावरेही विकली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 11:52 PM2019-05-19T23:52:20+5:302019-05-19T23:52:25+5:30
श्रीकांत ºहायकर । लोकमत न्यूज नेटवर्क धामोड : ‘पाणीदार जिल्हा' अशी कोल्हापूर जिल्ह्याची ओळख असताना व त्यातल्या त्यात ‘पाण्याचा ...
श्रीकांत ºहायकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामोड : ‘पाणीदार जिल्हा' अशी कोल्हापूर जिल्ह्याची ओळख असताना व त्यातल्या त्यात ‘पाण्याचा खजिना’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ख्याती पावलेल्या राधानगरी तालुक्यात पाणीटंचाईच्या प्रचंड झळा बसत आहेत. तालुक्याच्या पश्चिम बाजूस असणाºया धामोड परिसरातील बहुतांशी वाड्या-वस्त्यांवर टंचाई आहे. पाल बुद्रुकचा पाणीप्रश्न तर ‘रात्रंदिन आम्हा पाणीयुद्धाचा प्रसंग’ अशा बनला आहे. पाण्याअभावी लोकांनी कवडीमोल दराने जनावरे विकली आहेत. काही शेतकऱ्यांनी हाताशी आलेली ऊसपिके चाºयासाठी कापली आहेत.
साधारणत: ५०० लोकवस्ती असणारे गाव चांदे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट आहे. या गावासाठी दहा वर्षांपूर्वी ‘केकतीचा झरा’ नावाच्या ओढ्याजवळून गावाशेजारील टाकीत सायफनने पाणी टाकून नळाद्वारे गावाला पुरविण्यात आले; पण गेल्या ४० ते ५० वर्षांत पहिल्यांदाच ह्या झºयाचे पाणी यावर्षी आटल्याने गेल्या महिनाभरापासून गावात पाणीच नाही. पिण्याचे पाणी महिला चार ते पाच किलोमीटरची पायपीट करून आणत आहेत. ऊसपीक तर हातचे केव्हाच निघून गेले आहे. ग्रामस्थ आणि जनावरांना या भीषण टंचाईस गेल्या एक महिन्यापासून तोंड द्यावे लागत आहे.
महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या भागातील पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन देऊन आम्हाला झुलवत ठेवण्याचा प्रकार लोकप्रतिनिधींनी केला असल्याचा आरोप आता पाण्यासाठी टाहो फोडणारे नागरिक करत आहेत. वेळोवेळी पाणीप्रश्न सोडविण्याचे गाजर दाखवत केवळ मतांचे राजकारण करणाºयांना येथील नागरिकांनी पाण्यासाठी वेळोवेळी निवेदनेही दिली आहेत; पण ही निवेदने धूळखात पडल्याची परखड भावना काही महिलांनी बोलून दाखवली.
पाणीटंचाईची दाहकता लक्षात घेऊन गावकºयांनी ग्रामपंचायतीची वाट न पाहता १ लाख रुपयांचा निधी लोकवर्गणीच्या माध्यमातून गोळा करत दोन कूपनलिका खोदल्या; पण या कूपनलिकांना पाणी लागले नाही म्हणून पुन्हा एकदा प्रत्येक कुटुंबाला १४०० रुपयांप्रमाणे वर्गणी गोळा करून या दोन दिवसांत पुन्हा दुसरी कूपनलिका खोदण्याचा निर्णय घेतला आहे. एवढे होऊनही या समस्येकडे ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी लक्ष द्यायला तयार नाहीत.
संतप्त झालेले गावातील नागरिक आता एकवटले आहेत. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केवळ टँकरद्वारे पाणी देऊन तात्पुरती मलमपट्टी न करता सरकारने कायमस्वरूपी आणि ठोस निर्णय तातडीने घेण्याची मागणी होत
आहे.