सांस्कृतिक क्लबआडून जुगार फार्मात
By admin | Published: March 18, 2017 01:05 AM2017-03-18T01:05:24+5:302017-03-18T01:05:24+5:30
उपनगरात वाढते प्रस्थ : कारवाई करण्यात अडचणी, बेकायदेशीरपणे लाखोंची उलाढाल
अमर पाटील--कळंबा --शहरातील टिंबर मार्केट परिसरात दोन रमी क्लब, साळोखेनगरातील रमी क्लब, संभाजीनगर पेट्रोलपंपालगतच्या कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळात चालणारा रमी क्लब, कळंबा मुख्य रस्त्यालगतचा रमी क्लब याखेरीज उपनगरातील खुल्या मैदानासह उद्यानात, रिकाम्या बंगल्यात सकाळी आठ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत रमीचे डाव जोरात चालू आहेत. रमी हा मनोरंजक खेळाचा प्रकार असल्याने त्यांच्याविरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यावर मर्यादा येतात. त्यामुळे पोलिस खाते सुद्धा हतबल बनले आहे; परंतु बहुतांशी ठिकाणी रमी आडून बेकायदेशीर बल्लारी, प्लस, तीन पानी सारख्या डावातून रोजची लाखांची उलाढाल होणारे डाव रंगत आहेत. ज्यात उपनगरातील युवावर्ग भरडला जात असून, कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत.
पोलिसी कारवाईस चकवा देण्यासाठी दहा ते पंधरा सभासद एकत्र येऊन कला, क्रीडा, सांस्कृतिक क्लब स्थापन करतात. ज्यास्
ााठी शासनाच्या धर्मादाय कार्यालयाची कायदेशीर परवानगी घेतली जाते; पण याच सांस्कृतिक क्लबच्या भिंतीआड रमीच्या डावासोबत इतर डाव मोठ्या प्रमाणात रंगतात. अशा क्लबमध्ये खेळायला गेलेला व्यक्ती मात्र खिसे रिकामे होऊनच बाहेर पडतो. रमीआडून काही ठिकाणी बल्लारी प्लसचे डाव रंगतात. अशा प्रकारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.
समाज विधायक कार्यासाठी स्थापित या क्लबमध्ये रमीसाठी मासिक मेंबर किंवा दिवसाचे टोकण देऊन कसून तपासणी करून आत घेतले जाते. क्लब पूर्णत: सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली ठेवला जातो. धाड पडल्यानंतर दाखवायचे फुटेज वेगळेच ठेवले जाते. रमी खेळणाऱ्यांची नाष्ट्यासह खाण्या-पिण्याची बडदास्त ठेवली जाते. सभासदांना मेंटेनन्सही द्यावा लागतो. परिसरातील नागरिकांनी तक्रारीसाठी पुढे येऊ नये यासाठी काहीजणांनी हिंस्र कुत्री व फाळकुटदादाही ठेवले आहेत. त्यामुळे अशा क्लबविरोधात तक्रारी होत नाहीत. हळूहळू रमीची वाटचाल बल्लारी व प्लसच्या लाखोंच्या उलाढाली करणाऱ्या डावांकडे वळली आहे. जे शोधणे व त्याचा बीमोड करणे पोलिसांसमोर आव्हान आहे.
यात क्लबमालकास स्वत:ला मोठा फायदा होतो. पोलिसी कारवाईचा ससेमिरा मागे नको म्हणून क्लबमध्ये समाज विधायक उपक्रमांसह रमीचे रेकॉर्डही व्यवस्थित ठेवले जाते. स्थानिक नागरिकांनी तक्रार करू नये, यासाठी ‘ना हरकती’च्या सह्यांची मोहीम समाज विधायक उपक्रमाआडून राबविली जाते. यातूनही पोलिसांनी अचानक कार्यवाही केल्यास सरळ पोलिसी नाहक त्रासाविरुद्ध हायकोर्टातून स्टे आणला जातो.
मनोरंजक डावाआडून पैशांचा डाव
रमीआडून बऱ्याच बेकायदेशीर क्लबमध्ये बल्लारी, प्लस, तीन पानी जोरात सुरू आहे. जे शोधणे पोलिस खात्यास आव्हान आहे.
कुटुंबासह समाजव्यवस्था बिघडविणाऱ्या या जुगाराचा शोध घेऊन त्याचा बीमोड करावा, ही मागणी आता जोर धरत आहे.