सांस्कृतिक चळवळीला मिळाले बळ
By admin | Published: February 3, 2015 09:48 PM2015-02-03T21:48:39+5:302015-02-03T23:54:08+5:30
एकांकी स्पर्धेला उर्त्स्फूत प्रतिसाद : ‘आम्ही रसिक’ संस्थेचे नेटके संयोजन
संदीप बावचे -जयसिंगपूर - शाहू महोत्सवानंतर जयसिंगपुरात शाहू करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा झाल्यामुळे सांस्कृतिक चळवळीला बळ मिळाले आहे. शतकमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या या शहरात विकासाबरोबर सांस्कृतिक घडामोडींकडेही तितकेच लक्ष दिले जात आहे. सन १९८९ साली शिरोळ तालुका सांस्कृतिक संघाची स्थापना झाली. गेली २५ वर्षे हा सांस्कृतिक महोत्सव पार पडला. राज्यात लोककलेचा राजाश्रय देणारे राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने हा महोत्सव आजपर्यंत साजरा झाला. खिद्रापूर येथील प्रसिद्ध करंडोळ वाद्यापासून ते कोथळीच्या गज नृत्यापर्यंत राज्य आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत गाजलेल्या विविध कला संघाची नोंदणी सांस्कृतिक संघाने केली. स्थानिक कलाकारांपासून रूपेरी व चंदेरी पडद्यांवरील अनेक नामवंत कलाकार आणि त्यांचा कलाविष्कार या निमित्ताने शहरवासियांना पाहावयास मिळाला. शाहू महोत्सवानंतर 'आम्ही रसिक' या संस्थेच्या माध्यमातून येथील पालिकेच्या नाट्यगृहात राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा पार पडल्या. राज्यातील २४ संघानी यात सहभाग घेतला होता. प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या करणारी ‘फुलपाखरू’ ही एकांकिका सुंदर अभिनयाने सादर झाली. 'तमसो मा जोतिर्गमय'या एकांकिकेनेदेखील आपला ठसा उमटवला. मुंबई थिएटर्स आयोजित ‘सायलेंट स्क्रिम’ ने प्रेक्षकांची मने जिंकली. चार दिवस चाललेल्या या स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षागृह अगदी खचाखच भरून गेला होता. जयसिंगपूरकरांनी जपलेला रसिकाश्रय व सांस्कृतिक ठेवा पाहून कलाकारही भारावून गेले. स्थानिक रंगभूमीला वेगळे वळण देणाऱ्या एकांकिका निश्चितच कौतुकास्पद ठरल्या. शहरातील उत्सवप्रिय माणूस आणि गणेशोत्सव याचे एक अतूट नाते निर्माण झाले आहे. अनेक विषयांतून सामाजिक प्रबोधनाबरोबर सांस्कृतिक चळवळीला बळ देण्याचे काम येथील शहरवासीयांनी केले आहे. एकांकिका स्पर्धेमुळे ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा जपला जात असल्याचे जाणवले.शाहू महोत्सव, इंडियन म्युझिक अकॅडमी, रोटरी, लायन्स, मेडिकल असोसिएशन, संघर्ष मंडळांकडून होणारी व्याख्याने निश्चितच सांस्कृतिक चळवळीला बळ देणारी ठरली आहेत. एकूणच भौतिक विकासाबरोबरच विविध संस्थानांच्या पाठिंब्यातून सुरू असलेली ही सांस्कृतिक घौडदौड अशीच सुरू ठेवण्याची गरज आहे.