सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साह द्विगुणित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:31 AM2019-01-07T00:31:22+5:302019-01-07T00:31:29+5:30
कोल्हापूर : भव्य आतषबाजी, तुतारीचा नाद, हलगीचा कडकडाट, बॉलिवूड डान्स, रांपा नृत्य, लाठी-काठी, पोलीस बँड, झांजपथक, लेझीम अशा विविधरंगी ...
कोल्हापूर : भव्य आतषबाजी, तुतारीचा नाद, हलगीचा कडकडाट, बॉलिवूड डान्स, रांपा नृत्य, लाठी-काठी, पोलीस बँड, झांजपथक, लेझीम अशा विविधरंगी आणि विविधढंगी सांस्कृतिक कार्यक्रमांनी सकाळच्या बोचणाऱ्या थंडीतही रविवारी आयोजित ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये धावणाºया स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित केला.
पोलीस परेड ग्राऊंडवर उडत्या चालीच्या संगीतावर अॅरोबिक्स स्टाईलने सुरू झालेल्या झुंबा डान्सने धावपटूंच्या वॉर्म अपला सुरुवात झाली आणि प्रत्येक रनच्या झालेल्या भव्य आतषबाजीने आकाशात इंद्रधनूचे रंग भरले. तुतारीचा निनाद, हलगीचा कडकडाट आणि वाकोबा झांजपथकाने सहभागींना धावण्यासाठी स्फुरण चढले.
पितळी गणपती चौकात पेठवडगावच्या श्री दत्तगुरू प्रासादिक भजनी मंडळाने वातावरणात भक्तीचे सूर भरले; तर पुढे धैर्यप्रसाद हॉलच्या चौकात पोलीस बॅँडमुळे अभिमानाची ज्योत पेटविली. येथेच उडणाºया मशीन बलून्सने आणि मिकी माऊसने फन रनर असलेल्या बालचमूंपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच गमतीदार अनुभव दिला. येथेच डीआॅन इट डान्स अॅँड फिटनेस स्टुडिओ या ग्रुपमधील मुलींनी लाठीच्या तालावर आधारित रापा नृत्य सादर केले. सेवा रुग्णालय परिसरात प्रिन्स शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांचे झांजपथक सज्ज होते. गोल्ड जिम येथे अल्फान्सो स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुरेख तालबद्ध बॅँडचा अनुभव दिला. हॉटेल सयाजी येथे श्रीधर सावंत विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी झांजा वाजविल्या; तर केएसबीपी चौकात जिजाऊ बालमंदिरच्या विद्यार्थ्यांनी लेझीमसह विविध कसरती सादर केल्या. पुढे शिवाजी विद्यापीठात ज्योतिर्लिंग विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने धावपटूंचा शीण घालविला. शांतिनिकेतन येथे देशभक्त रत्नाप्पा कुंभार शाळेचे झांजपथक धावपटूंना चीअर अप करीत होते.
पोलीस ग्राऊंडमधील मुख्य व्यासपीठावरही बक्षीस समारंभ होईपर्यंत सहस्रम बॅँडचे गायक विशाल सुतार व वैष्णवी गोरड यांनी बहारदार गीते सादर केली; तर चंद्रकांत पाटील यांच्या डीआॅन इट डान्स अॅँड फिटनेस ग्रुपने लोकनृत्य व बॉलिवूड नृत्याविष्काराने थिरकावले.