कोल्हापूरची संस्कृती प्रतिबिंबित व्हावी
By Admin | Published: June 18, 2016 12:36 AM2016-06-18T00:36:18+5:302016-06-18T00:41:22+5:30
केदार मुनीश्वर : यात्रा-उत्सव, अन्य देवस्थानांचाही समावेश हवा
कोल्हापूर : कोल्हापूर हे धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. अंबाबाई मंदिर हे तीर्थक्षेत्राचे महत्वाचे स्थान आहेच शिवाय येथील कपिलेश्वर ग्रामदैवत, तीर्थकुंड, नवदुर्गा, अशा धार्मिक स्थानांचाही आराखड्यात समावेश व्हायला हवा. कोल्हापूरची संस्कृती प्रतिबिंबित झाली पाहिजे. सध्या बनविण्यात आलेल्या आराखड्याला शहराचा विकास आराखडा म्हणावा लागेल. तीर्थक्षेत्र म्हणून विकास करताना केवळ आर्थिक फायदा हा मूळ हेतू नसावा. मोठ-मोठ्या इमारती, रस्ते म्हणजे मंदिराचा विकास नव्हे हे लक्षात घेतले पाहिजे.
अंबाबाईची उत्सवमूर्ती अष्टमीला नगरप्रदक्षिणेला आणि चैत्रात रथोत्सवासाठी मंदिरातून बाहेर पडते. देवीच्या नगरप्रदक्षिणेचा हा मार्गदेखील हेरिटेज वॉकसाठी योग्य आहे. पंचगंगा नदीघाटालादेखील धार्मिक महत्त्व आहे. याशिवाय शहरातील विविध यात्रा, उत्सव, कोल्हापूर शहरासह बाह्य परिसरातील देवता यांचाही विकास आराखड्यात समावेश करता येईल. या तीर्थक्षेत्रांचा विकास झाला की शहराचा विकास होईलच. त्यासाठी आराखडे बनवावे लागणार नाहीत.
कोल्हापुरात आलेला भाविक अंबाबाईचे दर्शन घेतो जेवण करून पुढच्या प्रवासाला निघतो, असे व्हायचे नसेल तर शहरातील अन्य देवस्थानांचाही विकास करून त्याला धार्मिक पर्यटनाचे रूप द्यायला हवे.
-अॅड. केदार मुनिश्वर (श्रीपूजक)
(समाप्त)