जिल्ह्यात आजपासून सायंकाळी पाचनंतर संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:18 AM2021-07-20T04:18:43+5:302021-07-20T04:18:43+5:30
कोल्हापूर : कोरोना आजाराचा पॉझिटिव्हिटी दर कमी आल्याने सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. पण दुकाने दुपारी चारला ...
कोल्हापूर : कोरोना आजाराचा पॉझिटिव्हिटी दर कमी आल्याने सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. पण दुकाने दुपारी चारला बंद झाल्यानंंतर ग्राहकांना घरी जाण्यासाठी एक तासाचा वेळ राहील. त्यानंतर संचारबंदी असेल. याची शहर, जिल्ह्यात आज (मंगळवार)पासून कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, सरकारच्या निकषानुसार जिल्हा तिसऱ्या स्तरावर आला आहे. यामुळे काही निर्बंध शिथील झाले आहेत. दुपारी ४ वाजेपर्यंत सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. तरीही जमावबंदी आणि सायंकाळी पाचनंतर संचारबंदी कायम असेल. राजकीय कार्यक्रम, आंदोलन, मोर्चा, गर्दीच्या कार्यक्रमांना बंदी आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गाव पातळीवरील कार्यक्रमांची माहिती पोलीस पाटलांनी देणे बंधनकारक आहे. ही माहिती न दिल्यास संबंधित पोलीस पाटलांवरही कारवाई होईल.
शहरातील मंगल कार्यालयांनी गर्दीचे कार्यक्रम स्वीकारू नयेत, अशा नोटीस देण्यात येत आहेत. रात्रीच्यावेळी हॉटेलमधून केवळ पार्सल देण्याची मुभा आहे. मात्र, असे काही ठिकाणी होत नसल्याचे समोर आले. याची गंभीर दखल घेतली आहे. दुकानदार, व्यापाऱ्यांनी दुकानात ग्राहकांना विनामास्क प्रवेश देऊ नये. एखादा ग्राहक विनामास्क आल्यास त्याला आपल्याकडील मास्क द्यावा. गर्दीमुळे पॉझिटिव्हिटी दर वाढल्यास पुन्हा जिल्हा चौथ्या स्तरावर जाईल. त्यानंतर सरसकट दुकाने उघडण्यावर निर्बंध येतील. त्यामुळे समाजातील सर्वच घटकांनी जबाबदारीने वागावे. गर्दी टाळण्यासाठी धबधबे, पर्यटन स्थळांवरही पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच कारवाईची मोहीमही तीव्र केली आहे, असे बलकवडे यांनी सांगितले.
चौकट
किती ही बेफिकिरी...
वारंवार सांगून, दंड करुनही आजही जिल्ह्यात रोज १,५०० जण विनामास्क रस्त्यावर फिरताना आढळतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर विनामास्कच्या एकूण ८४ हजार जणांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय वाहन परवाना नसलेले, ट्रीपल सीट अशा वाहतूक नियमांचा भंग केलेल्या १ लाख ७० हजार जणांवर कारवाई केल्याचे अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.
चौकट
४०० पोलिसांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु
जिल्ह्यात एकूण २,८०० पोलीस आहेत. सरकारच्या नियमानुसार पहिल्या टप्प्यात ४०० पोलिसांच्या प्रशासकीय बदल्या केल्या जातील. त्याची बदली प्रक्रिया सुरू झाली आहे, असेही बलकवडे यांनी सांगितले.