कोरोनावर मात करायची असेल तर कर्फ्यू लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:17 AM2021-07-15T04:17:16+5:302021-07-15T04:17:16+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाला खरोखरच जर कोरोनावर मात करायची असेल तर तात्पुरत्या आणि ...
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाला खरोखरच जर कोरोनावर मात करायची असेल तर तात्पुरत्या आणि अर्धवट उपाययोजना करण्यापेक्षा सरळ महाराष्ट्र राज्यात आठ दिवस कर्फ्यू जाहीर करावा, अशी मागणी येथील महाद्वार रस्ता व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शाम जोशी यांनी केली आहे.
ते म्हणाले, शासनाने अत्यावश्यक सेवा सोडून अन्य दुकानदारांवर निर्बंध घातले तरी रस्त्यावरील गर्दी अजिबात कमी झालेली नाही. पाच दिवस चारपर्यंत दुकाने उघडी ठेवायला परवानगी आणि शनिवारी, रविवारी बंदी यामुळे कोरोना संपणार नाही. उलट पुढच्या सणासुदीच्या दिवसात जर दुकाने बंद ठेवायची नसतील तर आताच संपूर्ण महाराष्ट्रात आठ दिवसांचा कर्फ्यू जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता फक्त इतर व्यापाऱ्यांवर बंदी आणून शासन यामध्ये यशस्वी होणार नाही. म्हणून सरसकट सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, नाही तर सर्व शासनाचे कर माफ करावेत, अशीही त्यांनी व्यापाऱ्यांच्यावतीने मागणी केली आहे.
चौकट
कोरोनासोबत जगू; पण उपाशी मरणार नाही
व्यापारीच कोरोना वाढवत आहेत असा शासनाने समज करून घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत शासनाने योग्य निर्णय घेऊन व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत. ही शासनाची जबाबदारी आहे. दुकाने बंद करून चालणार नाहीत. तर लसीकरण मोठ्या प्रमाणावर करून कोरोनाला पायबंद घालणे ही शासनाची जबाबदारी आहे. एकवेळ आम्ही कोरोनासोबत जगू; परंतु उपाशी मरणार नाही, अशी आता व्यापाऱ्यांची भावना झाली आहे, असे जोशी यांनी सांगितले.