मलकापूर शहरात संचारबंदीचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:23 AM2021-04-17T04:23:04+5:302021-04-17T04:23:04+5:30
मलकापूर : कोरोना प्रतिबंधासाठी पुकारलेल्या संचारबंदीचा मलकापूर शहरात दुसऱ्या दिवशी फज्जा उडाला. काही दुकाने वगळता सर्व दुकाने ...
मलकापूर : कोरोना प्रतिबंधासाठी पुकारलेल्या संचारबंदीचा मलकापूर शहरात दुसऱ्या दिवशी फज्जा उडाला. काही दुकाने वगळता सर्व दुकाने सुरु होती. बाजारपेठेत गर्दी झाली होती. दिवसभर शहरात नागरिकांची गर्दी दिसत होती. पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे नागरिक व व्यापारी ऐकत नसल्यामुळे पालिका प्रशासन हतबल झाले होते. पोलिसांनी गस्त घालणे गरजेचे आहे. अन्यथा शहरात कोरोना रुग्ण वाढण्यास वेळ लागणार नाही.
शहरात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत . त्यामध्ये टू व्हिलर धारकांची मोठी संख्या आहे . नागरिक दिवसभर फिरताना दिसत होते . त्यामुळे पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनासमोर कोणावर कारवाई करायची असा प्रश्न पडला आहे. पालिका प्रशासनाने ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. ठराविक वेळेचे नियोजन केले तर गर्दीवर नियंत्रण राहू शकते . शहारातून पोलीस व होमगार्ड फिरत आहेत . मात्र कोणाची चौकशी करीत नसल्यामुळे शाहूवाडी , बांबवडे आदी बाजार पेठेत नागरिकांनी गर्दी केली होती . कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावरील येळाणे येथे नागरिकांनी गर्दी केली होती . मंगळवार पेठ , शाळी नाका , पेरीड नाका या ठिकाणी खरेदी साठी नागरिक जमा झाले होते. जवळपास काही ठराविक लोकांनी मास्कचा वापर केला होता . पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याशिवाय शहरातील गर्दी हटणार नाही .