मुरगूड शहरात संचारबंदीचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:24 AM2021-04-16T04:24:12+5:302021-04-16T04:24:12+5:30
मुरगूड :- कोरोना प्रतिबंधासाठी पुकारलेल्या संचारबंदीचा मुरगूड शहरात पहिल्याच दिवशी फज्जा उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व ...
मुरगूड :- कोरोना प्रतिबंधासाठी पुकारलेल्या संचारबंदीचा मुरगूड शहरात पहिल्याच दिवशी फज्जा उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. पण नागरिकांचा मुक्तसंचार सुरू होता. दिवसभर शहर परिसरात ही रस्त्यावर मोठी गर्दी होती. पोलीस प्रशासन व पालिका प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र होते.
कोणाची कोणतीही चौकशी होत नसल्याने सकाळपेक्षा संध्याकाळी नागरिकांनी गर्दी केली.
अत्यावश्यक सेवेमध्ये किराणा,दूध,बेकरी, भाजीपाला विक्रीस परवानगी दिल्याने याचेच कारण सांगून नागरिक दिवसभर फिरताना दिसत होते. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनासमोर कोणावर कारवाई करायची हा प्रश्न निर्माण झाला होता. स्थानिक प्रशासनाने याबाबत ठोस निर्णय घेणे अपेक्षित होते. मागील लॉकडाऊनच्या काळात किराणा आणि भाजीपाला विक्रीसाठी ठराविक वेळ दिलेली होती. या पद्धतीने गर्दीवर आळा बसू शकतो त्यामुळे ठराविक वेळेचे नियोजन करावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
गुरूवारी सकाळी काही काळ महिला पोलीस एसटी स्टँड परिसरात तैनात होत्या पण कोणत्याही नागरिकांची चौकशी होत नव्हती. याच पद्धतीने निपाणी राधानगरी रस्त्यावर पोलीस होते त्यांची ही अवस्था अशीच. दरम्यान पोलीस प्रशासन म्हणते पालिका प्रशासन सहकार्य करत नाही तर पालिका प्रशासन म्हणते आम्हाला अधिकार नाहीत एकंदरीतच दोघांकडून टोलवाटोलवी होत असून नियमांच्या अधीन राहून रहदारीवर अंकुश ठेवणे कठीण जाणार आहे. त्यामुळे शासन नियमांमध्ये बदल करते की संचारबंदीची अवस्था अशीच राहते हे काही दिवसात समजेल.
अन्यथा अत्यावश्यक सेवा ही बंद
शहरात नागरिकांनी विनाकारण फिरणे थांबवले नाही तर येत्या दोन दिवसात याची पाहणी केली जाईल आणि त्यानंतर शहरात कडक संचारबंदी करण्याचा दृष्टीने अत्यावश्यक सेवा ही बंद करण्याचा प्रस्ताव तयार करून स्थानिक प्रशासनाच्या निर्णयासाठी ठेवला जाईल.
संजय गायकवाड
मुख्याधिकारी
मुरगूड नगरपरिषद