शिवसेनेविरोधातील उमेदवारीची उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:24 AM2021-04-01T04:24:03+5:302021-04-01T04:24:03+5:30

कोल्हापूर : माजी महापौर नंदकुमार वळंजू यांचा दुप्पट मतांनी पराभव करून चर्चेत आलेले शिवसेनेचे नियाज खान यांचा शास्त्रीनगर प्रभाग ...

Curiosity about the candidature against Shiv Sena | शिवसेनेविरोधातील उमेदवारीची उत्सुकता

शिवसेनेविरोधातील उमेदवारीची उत्सुकता

Next

कोल्हापूर : माजी महापौर नंदकुमार वळंजू यांचा दुप्पट मतांनी पराभव करून चर्चेत आलेले शिवसेनेचे नियाज खान यांचा शास्त्रीनगर प्रभाग यंदा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या नियाज खान यांच्या पत्नी जाहिदा यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतर पक्षांच्या माध्यमातून उमेदवारी मिळावी, यासाठीही कार्यकर्त्यांनी जोडण्या घालायला सुरुवात केली आहे.

शास्त्रीनगर, शाहू वसाहत, सुधाकरनगर, वाय. पी. पोवार नगर या परिसराचा समावेश असलेल्या शास्त्रीनगर या प्रभागातून याआधी अनेक वेळा प्रभागाच्या बाहेर वास्तव्यास असणारे उमेदवार निवडून आले आहेत. हरिदास सोनवणे, त्यांची पत्नी, हरिभाऊ प्रभावळकर ही काही उदाहरणे आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने तीन वर्कशॉपच्या माध्यमातून मेकॅनिक म्हणून काम करणाऱ्या नियाज खान यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. या परिसरात असलेला जनसंपर्क आणि तरुण आणि प्रभागातील चेहरा या बळावर नियाज खान यांनी माजी महापौर नंदकुमार वळंजू यांचा ७७० मतांनी पराभव केला. इतर उमेदवार तुलनेत फार पाठीमागे राहिले.

निवडून आल्यानंतर नियाज खान यांनी चौफेर कामे करण्याचा प्रयत्न केला. त्यांना एक वर्ष परिवहन सभापती म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. कोरोनाच्या काळात पत्नीसह ते रुग्णसेवेतही कार्यरत होते. जनतेशी थेट संपर्क हेच त्यांचे बलस्थान आहे. याच बळावर ते शिवसेनेकडून पत्नीला रिंगणात उतरवणार आहेत. त्यांच्यासोबत कार्यरत असणारे रविकिरण गवळी हे पत्नीला या प्रभागातून उभे करणार असल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र, गवळी यांनीच त्याचे खंडन केले आहे. दुसरीकडे राजलक्ष्मी पोळ, मंगल निप्पाणीकर या भाजप किंवा ताराराणीकडून, जयश्री कारवेकर, विद्या निरंकारी या काँग्रेस, राष्ट्रवादीकडून इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. जयश्री डंग यांनीही तयारी सुरू केली आहे. मात्र, पुन्हा महानगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

प्रभाग क्रमांक ४१

शास्त्रीनगर

विद्यमान नगरसेवक

नियाज खान

आताचे आरक्षण

सर्वसाधारण महिला

गत निवडणुकीतील प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते...

सादाब नजमल अत्तार राष्ट्रवादी ३८५

दत्ता दौलत कांबळे काँग्रेस ३६९

नियाज आसिफ खान शिवसेना १६१४

निहाल फिरोज खान अपक्ष २२

सचिन मारुती सोनटक्के हिंदू महासभा ४४

नंदकुमार आनंदा वळंजू ताराराणी ८४४

कोट

प्रभागातील बहुतांशी कामे झाली आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, ओपन जिम, वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालये अशी साडेपाच कोटी रुपयांची कामे केली आहेत. कोरोना काळात पत्नीसह सातत्याने कार्यरत होतो. या काळात ५० हून अधिक पॉझिटिव्ह रुग्णांना सर्वतोपरी मदत करून त्यांना बरे करून घरी आणले. वाय. पी. पोवार नगरमध्ये अनेक वर्षांनंतर डांबरी रस्ते झाले.

नियाज खान

विद्यमान नगरसेवक

ही झाली आहेत कामे.

सुधाकर नगरमधील पाण्याची अडचण केली दूर. शाहू वसाहतीमध्ये पाणीपुरवठा, वैयक्तिक शौचालये, वीजपुरवठ्याची कामे. छाया कॉलनीतील चॅनेलचे काम केले. सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, तीन वर्षांपूर्वीच एलईडी लाईट्‌स बसवले. शास्त्रीनगरमधील बोळांमध्ये सिमेंटचे रस्ते, गटर्स केली.

हे आहेत प्रश्न..

झोपडपट्टी परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न आहे. कचरा उठाव वेळेत न होणे, गटारं तुंबली आहेत, प्रभागात मैदान, ज्येष्ठांसाठी नाना-नानी पार्क आवश्यक आहे, असे नागरिकांचे मत आहे. आईचा पुतळ्याकडे जाणारा रस्ता लवकर होण्याची गरज व्यक्त होत आहे.

२१०३२०२१ कोल शास्त्रीनगर ०१

शास्त्रीनगर प्रभागामध्ये अशा पद्धतीने ओपन जिम उभारण्यात आले आहेत.

Web Title: Curiosity about the candidature against Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.