‘गोकुळ’ सत्तारूढ गटात ‘करवीर’, ‘भुदरगड’बाबतच उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:22 AM2021-04-12T04:22:36+5:302021-04-12T04:22:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’साठी दोन्ही आघाड्यांकडून पॅनल बांधणीस वेग आला असून, सत्तारूढ गटाकडून अकरा विद्यमान संचालकांसह चौदा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’साठी दोन्ही आघाड्यांकडून पॅनल बांधणीस वेग आला असून, सत्तारूढ गटाकडून अकरा विद्यमान संचालकांसह चौदा उमेदवार निश्चित आहेत. ‘करवीर’ व भुदरगड तालुक्यातील एका जागेबाबतच उत्सुकता असून, इतर ठिकाणी फारशा अडचणी दिसत नाहीत. तरीही विरोधी आघाडीकडील इच्छुकांची भाऊगर्दी, त्यातून होणारी नाराजांवर सत्तारूढ गटाचे लक्ष असल्याने माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत पॅनलचा सस्पेन्स राहण्याची शक्यता आहे.
पन्हाळ्यातून नरके, जाधव, तर शाहूवाडीतून अनुराधा पाटील निश्चित
पन्हाळ्यातून चेतन नरके हे सर्वसाधारण, तर विश्वास जाधव भटक्या विमुक्त जाती गटातून व शाहूवाडीतून अनुराधा पाटील- सरूडकर यांची उमेदवारी निश्चित आहे. पॅनल भक्कम करण्यासाठी तडजोड करायची झाल्यास पाटील यांचे महिलाऐवजी सर्वसाधारण गटातून नाव पुढे येऊ शकते.
आजरातून ‘आपटे’, तर गडहिंग्लजमधून ‘हत्तरकी’
आजरातून विद्यमान अध्यक्ष रवींद्र आपटे, तर गडहिंग्लजमधून सदानंद हत्तरकी यांची व कागलमधून रणजितसिंह पाटील व अंबरीश घाटगे यांची उमेदवारी निश्चित आहे.
भुदरगडमध्ये दुसऱ्या जागेसाठी अनेक पर्याय
भुदरगड तालुक्यात धैर्यशील देसाई यांच्या सोबतीला बाबा देसाई, धनाजीराव देसाई, दौलतराव जाधव, यशवंत नांदेकर, सत्यजित जाधव इच्छुक आहेत. बाबा देसाई, धनाजीराव देसाई व नांदेकर यांच्यापैकी एकाची वर्णी लागू शकते. येथे महिला गटातून उमेदवारी द्यायची म्हटल्यास सुनीता धनाजीराव देसाई व सारिका नांदेकर यांच्यापैकी एक नाव निश्चित होईल. या सगळ्यांनाच थांबवून ऐनवेळी अनुसूचित जाती गटातून दिनकर कांबळे यांचे नावही पुढे येऊ शकते.
राधानगरीतून धुंदरे निश्चित, रवीश पाटील यांचे नाव पुढे
राधानगरीतून पी.डी. धुंदरे यांच्या जोडीला राधानगरीचे उपसभापती रवीश पाटील-कौलवकर, हिंदूराव चौगले, प्रभाकर पाटील, धनश्री सुभाष पाटील- सिरसेकर, राजाराम भाटले इच्छुक आहेत. भाटले यांच्यासाठी महादेवराव महाडिक आग्रही आहेत. सुभाष पाटील हे आमदार पी.एन. पाटील यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. मात्र, अरुण डोंगळे यांच्यामुळे कमी झालेल्या मतांची बेरीज भरून काढायची झाल्यास ‘रवीश’ यांचे नाव पुढे येऊ शकते.
चंदगडमध्ये दुसऱ्या जागेबाबत उत्सुकता
चंदगडमध्ये विद्यमान संचालक दीपक पाटील यांची उमेदवार निश्चित आहे. येथे ३४७ मते असल्याने दुसरी जागा देणे फायदेशीर ठरू शकते. मात्र, माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांच्या भूमिकेवरच दुसऱ्या जागेचा निर्णय होईल. येथून मोनाली परब व वसंत निकम यांच्या नावाची चर्चा आहे.
‘हातकणंगले’, शिरोळची जबाबदारी महाडिक यांच्यावर
शिरोळमध्ये १३४ व हातकणंगले मध्ये ९६ मते आहेत. दोन्ही तालुक्यांचे प्रतिनिधित्व शौमिक महाडिक या करू शकतात. ‘स्वाभिमानी’ने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. संघटना सत्तारूढ गटासोबत राहिली आणि त्यांना एक जागा द्यायचे ठरले, तर वसंत पाटील (शाहूवाडी) व प्रभू भोजे (कसबा सांगाव) यापैकी एकाची वर्णी लागू शकते.
‘करवीर’मध्ये दोन नवीन चेहऱ्यांना संधी
करवीरमध्ये बाळासाहेब खाडे, उदय पाटील, सत्यजित पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे. ‘दक्षिण’मधून तानाजी पाटील व प्रतापसिंह पाटील- कावणेकर यांच्यापैकी एकाची वर्णी लागू शकते. करवीरमधील पाचवी जागेवर हंबीरराव वळके, भारत पाटील- भुयेकर, एस.के. पाटील, तुकाराम पाटील, रघू पाटील- चिखलीकर यांच्या नावाची चर्चा असून, पाटील- भुयेकर व एस.के. पाटील यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. विरोधी आघाडीतील नाराज सत्तारूढ गटाच्या संपर्कात असून, ते आले तर सहाव्या जागेचा विचार होऊ शकतो.