विरोधी शाहू आघाडीतील एक-दोन जागांबाबतच उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:24 AM2021-04-11T04:24:12+5:302021-04-11T04:24:12+5:30

राजाराम लोंढे लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत विरोधी राजर्षी शाहू आघाडीत इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने उमेदवारीसाठी शेवटपर्यंत चढाओढ ...

Curiosity about one or two seats in the opposition Shahu front | विरोधी शाहू आघाडीतील एक-दोन जागांबाबतच उत्सुकता

विरोधी शाहू आघाडीतील एक-दोन जागांबाबतच उत्सुकता

Next

राजाराम लोंढे

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत विरोधी राजर्षी शाहू आघाडीत इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने उमेदवारीसाठी शेवटपर्यंत चढाओढ राहणार आहे. मात्र, अंतर्गत हालचाली पाहता बहुतांशी उमेदवार निश्चित झाले असून, एक-दोन जागांबाबतच उत्सुकता राहिली आहे. पॅनलमध्ये दोन विद्यमान, दोन माजी संचालकांसह १७ नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आघाडीच्या नेत्यांमध्ये नावांवर खल होऊन त्याचदिवशी पॅनलवर शिक्कामोर्तब करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

पन्हाळ्यातून ‘अजित’, ‘अमरसिंह’ निश्चित

पन्हाळ्यातून अजित नरके व इतर मागासवर्गीय गटातून अमरसिंह पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे.

कागल, शाहूवाडीतील चित्र स्पष्टच

कागलमधून नवीद मुश्रीफ व वीरेंद्र मंडलिक यांची, तर शाहूवाडीतूनही कर्णसिंह गायकवाड यांची उमेदवारी निश्चित आहे.

आजरात ‘शिंपी’, रेडेकर यांच्यात स्पर्धा

आजरा तालुक्यातून विष्णुपंत केसरकर, अभिषेक शिंपी, एम.के. देसाई व अंजना रेडेकर इच्छुक आहेत. मात्र, ठरावांचे गणित आणि भविष्यातील बेरजेचे राजकारण पाहता शिंपी व रेडेकर यांच्यातच उमेदवारीसाठी स्पर्धा राहणार आहे.

चंदगडमधून सुश्मिता पाटील रिंगणात

चंदगडमधून आमदार राजेश पाटील हे विद्यमान संचालक असले तरी त्यांनी पत्नी ‘सुश्मिता’ यांना रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. ‘सुश्मिता’ या दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक यांच्या कन्या आहेत. दुसरी जागा द्यायची ठरली, तर येथे विशाल गोपाळराव पाटील व विक्रमसिंह सुरेश चव्हाण हे इच्छुक असले तरी चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते.

भुदरगडमध्ये ‘रणजितसिंह’ यांच्या जोडीला ‘घोरपडे’ की ’जाधव’

भुदरगडमध्ये रणजितसिंह कृ. पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे. दुसऱ्या जागेसाठी सत्यजित जाधव, सचिन घोरपडे व नंदकुमार ढेंगे यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. आमदार प्रकाश आबीटकर यांना दुसरी जागा द्यायची झाल्यास ढेेंगे यांचा विचार होऊ शकतो. राधानगरीतून अभिजित तायशेटे यांना उमेदवारी दिल्यास सर्वांना चालणारा आणि पालकमंत्री सतेज पाटील यांचे नेतृत्वाखाली काम करणारे सचिन घोरपडे यांच्या पत्नी वैशाली यांना संधी मिळू शकते.

शिरोळमधून दिलीप पाटील यांच्यावर एकमत?

शिरोळमधून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व ‘दत’ कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांना चालणारा चेहरा म्हणून माजी संचालक दिलीप पाटील यांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता आहे. येथे अद्याप ‘स्वाभिमानी’ची भूमिका अद्याप अस्पष्ट आहे.

गडहिंग्लज सतीश पाटील यांचे नाव आघाडीवर

गडहिंग्लजमधून मागील निवडणुकीत बाळासाहेब कुपेकर यांनी निवडणूक लढवली होती. या वेळेला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी तयारी केली आहे. गडहिंग्लजचे राजकारण आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भूमिका पाहता येथे पाटीलच बाजी मारण्याची शक्यता आहे.

‘मिणचेकर’ यांच्या रूपाने हातकणंगलेला संधी

हातकणंगलेमध्ये ठरावधारकांची संख्या कमी असल्याने अनेक वर्षांपासून ‘गोकुळ’मध्ये प्रतिनिधित्व मिळालेले नाही. येथून माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी संधी देऊन तालुक्याला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न आहे.

करवीरमध्ये ‘गवळी’ना लॉटरी लागणार?

करवीरमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे. विरोधी आघाडीकडून विद्यमान संचालक विश्वास पाटील, माजी संचालक बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील-चुयेकर यांची नावे निश्चित आहेत. ‘शेकाप’कडून अनेक नावे चर्चेत असली तरी गेली पाच वर्षे ‘गोकुळ बचाव’च्या माध्यमातून आक्रमकपणे भूमिका मांडणारे बाबासाहेब देवकर यांचे नाव संपतराव पवार पुढे करण्याची शक्यता आहे. भटक्या विमुक्त जाती गटातून पालकमंत्री सतेज पाटील गटाचे युवराज गवळी (पाचगाव) व बयाजी शेळके (गगनबावडा) हे प्रयत्नशील आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबूराव हजारे यांचे सुपुत्र दत्ताजीराव हजारे (वाशी) यांच्या नावाची चर्चा आहे. ‘दक्षिण’मधील राजकारण बळकट करण्यासाठी मंत्री पाटील यांना दुसरी जागा हवी आहे. त्यातून किरणसिंह पाटील व रमा बोंद्रे, गवळी यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. माजी आमदार चंद्रदीप नरके हेही दुसऱ्या जागेवर आडून बसले आहेत. त्यांच्याकडून किशोर पाटील, एस.आर. पाटील, अजित पाटील, रवींद्र मडके यांचे प्रयत्न सुरू आहेत.

राधानगरीत उमेदवारी निवडीत कसरत

राधानगरीतून अरुण डोंगळे हे निश्चित आहेत. आमदार प्रकाश आबीटकर यांच्याकडून अभिजित तायशेटे यांनी तर प्रचारही सुरू केला आहे. तिसरी जागा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांच्या गटाला मिळणार आहे. त्यांनी स्वत: अर्ज दाखल केला असला तरी कार्यकर्त्याला संधी देण्याची त्यांची मानसिकता आहे. विजयसिह मोरे यांनीही मंत्री सतेज पाटील यांना साथ दिली आहे. त्यामुळे येथे उमेदवारीवरून पेच निर्माण होऊ शकतो.

Web Title: Curiosity about one or two seats in the opposition Shahu front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.