विराेधी पॅनलमध्ये राखीव जागांबाबतच उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:22 AM2021-03-21T04:22:10+5:302021-03-21T04:22:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सत्तारूढपेक्षा विरोधी पॅनलमध्ये इच्छुकांची गर्दी वाढली आहे. सर्वसाधारण गटातील उमेदवार बऱ्यापैकी निश्चित झाले असून, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सत्तारूढपेक्षा विरोधी पॅनलमध्ये इच्छुकांची गर्दी वाढली आहे. सर्वसाधारण गटातील उमेदवार बऱ्यापैकी निश्चित झाले असून, केवळ राखीव गटातील तीन-चार जागांबाबतच उत्सुकता राहिली आहे. पॅनलमध्ये बहुतांशी उमेदवार हे नेत्यांचे वारसदार राहणार असून, राखीव गटातील दोन जागांवरच सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळणार हे जवळपास नक्की आहे.
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी तगडे पॅनल बांधण्याची व्यूहरचना केली आहे. त्यानुसारच बेरजेचे राजकारण सुरू आहे. यावेळच्या निवडणुकीत तीन जागा वाढल्याने किमान विरोधी पॅनलमध्ये तरी सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा दूध उत्पादकांची होती. मात्र, एकूण पॅनल बांधणीच्या हालचाली पाहता, सर्वसाधारण गटातील बहुतांशी जागा निश्चित झाल्या आहेत. राखीव पाच जागांबाबतच उत्सुकता राहणार आहे. एकूणच पॅनलवर मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री सतेज पाटील यांचे वर्चस्व राहणार आहे. सोबत येणाऱ्या नेत्यांना एकेक जागा देऊन रिंगणात उतरण्याची तयारी दोन्ही नेत्यांनी केली आहे.
पाच वर्षे पळालेल्यांचे काय?
मागील पाच वर्षे सत्तारूढ गटाविरोधात पराभूत पॅनलमधील बहुतांश जणांनी रस्त्यावर उतरून संघर्ष केला. यामध्ये बाबासाहेब देवकर, किरणसिंह पाटील, किशोर पाटील, बाळ कुपेकर, विजयसिंह माेरे, अंजना रेडेकर, रमा बोंद्रे आदींनी निकराची लढाई केली. आता पॅनल वजनदार होते म्हटल्यावर अनेक नावे पुढे येत आहेत.
पन्हाळा-शाहूवाडीत त्रांगडे
माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर हे विरोधी आघाडीसोबत आले आहेत. कर्णसिंह गायकवाड हे पन्हाळा-शाहूवाडीच्या राजकारणात आमदार विनय कोरे यांच्यासाेबत असले तरी ‘गोकुळ’मध्ये ते मंत्री सतेज पाटील यांच्या बरोबर दिसतात. त्यामुळे येथे आमदार कोरे काय भूमिका घेतात, याकडे दोन्ही तालुक्याचे लक्ष आहे.
आबाजींमुळे किशोर पाटलांची गोची
मागील निवडणुकीत कमी मतानी ‘कुंभी’चे संचालक किशोर पाटील (शिरोली दुमाला) पराभूत झाले होते. माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली ते पाच वर्षे सक्रिय आहेत. मात्र, ऐन वेळच्या घडामोडीत विश्वास पाटील (आबाजी) विरोधकांच्या छावणीत आल्याने त्यांची गोची झाली आहे. विरोधी पॅनल एकाच गावात दोन उमेदवार देणार की किशाेर पाटील कोणती भूमिका घेणार, याकडे परिसराचे लक्ष आहे.
कुपेकर, दिलीप पाटील यांच्याबद्दल जर-तर
माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या गटानेही ‘गोकुळ’ची तयारी केली आहे. त्यामुळे गडहिंग्लजचा विचार करताना संध्यादेवी यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. शिरोळमधून दिलीप पाटील हे प्रमुख दावेदार असले तरी त्यांना उमेदवारी देताना ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या भूमिकाही महत्त्वाच्या ठरणार आहेत.
आनंदराव पाटील-चुयेकर परिवर्तन आघाडीचे संभाव्य उमेदवार-
विश्वास पाटील, अरुण डोंगळे, आमदार राजेश पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर, अनुराधा पाटील-सरूडकर, वीरेंद्र मंडलिक, अर्चना ए. पाटील, रणजितसिंह के. पाटील, नवीद मुश्रीफ, अजित नरके, विजयसिंह मोरे, कर्णसिंह गायकवाड, अंजना रेडेकर.