कोल्हापूरकरांमध्ये उत्सुकता : काऊंटडाऊन सुरू-लॉकडाऊन वाढणार की शिथिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 12:22 PM2020-05-02T12:22:56+5:302020-05-02T12:25:25+5:30
दोन दिवसांनी म्हणजे ३ मे रोजी दुसºया टप्प्यातील लॉकडाऊनची मुदत पूर्ण होत आहे. देशात अद्यापही कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी पुन्हा लॉकडाऊनची मुदत वाढविणार की शिथिल करणार, हा शहरातील चर्चेचा विषय बनला आहे.
कोल्हापूर : लॉकडाऊन वाढणार की शिथिल होणार याबद्दल संपूर्ण कोल्हापूरकरांमध्ये उत्सुकता लागून आहे. दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनची मुदत रविवारी (दि. ३) पूर्ण होत आहे. दरम्यान, काही व्यावसायिकांनी किरकोळ स्वरूपात व्यवसायाला सुरुवात केली. दोन दिवसांनी पूर्ण क्षमतेने व्यवसाय सुरू होतील, या आशेने काहींनी दुकानांची स्वच्छता, रंगरंगोटी सुरू केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू केला असून संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अत्यावश्यक वगळता सर्व व्यवसाय बंद आहेत. अखंड सव्वा महिना व्यवसाय बंद झाल्यामुळे अनेकांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. हातावर पोट असणाऱ्यांना उपासमारीची वेळ आली आहे. दोन दिवसांनी म्हणजे ३ मे रोजी दुसºया टप्प्यातील लॉकडाऊनची मुदत पूर्ण होत आहे. देशात अद्यापही कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी पुन्हा लॉकडाऊनची मुदत वाढविणार की शिथिल करणार, हा शहरातील चर्चेचा विषय बनला आहे.
संयम सुटतोय
मोदींनी प्रथम १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन केले होते. यानंतर रुग्ण वाढतच असल्याने पुन्हा ३ मेपर्यंत यामध्ये वाढ करण्यात आली. अखंड सव्वा महिना घरात थांबल्यामुळे नागरिकांचा संयम सुटत आहे. अनेकांसमोर आर्थिक संकट उभे आहे. परिणामी ३ मे रोजीची वाट न पाहता काहींनी किरकोळ स्वरूपात व्यवसाय सुरू केले आहेत. टोपी, रुमाल, बरण्या, होजिअरी, पत्रावळ्यांच्या विक्रीसाठी काही फेरीवाले रस्त्यांवर आहेत. काहींनी अर्धी दुकाने उघडून छुप्या पद्धतीने व्यवसाय सुरू केला आहे.
बाजारपेठेत लॉकडाऊन शिथिल होण्यापूर्वीच गर्दी
जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे. लॉकडाऊनबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसतानाही नागरिकांची मात्र बाजारपेठेत गर्दी कायम आहे. लक्ष्मीपुरी, निवृत्ती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, ताटाकडील तालीम परिसर, महापालिका परिसर या ठिकाणी जत्रेचे स्वरूप आले आहे.