स्वातीताई कोणता झेंडा हाती घेणार?; 'गडहिंग्लज'सह कोल्हापूर जिल्ह्याला उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 01:00 PM2023-10-28T13:00:45+5:302023-10-28T13:05:49+5:30

चंदगड / कागलची उमेदवारी ?

Curious about Swati Kori upcoming move in Gadhinglaj politics | स्वातीताई कोणता झेंडा हाती घेणार?; 'गडहिंग्लज'सह कोल्हापूर जिल्ह्याला उत्सुकता

स्वातीताई कोणता झेंडा हाती घेणार?; 'गडहिंग्लज'सह कोल्हापूर जिल्ह्याला उत्सुकता

राम मगदूम 

गडहिंग्लज (कोल्हापूर) : जनता दलाचे दिवंगत ज्येष्ठ नेते अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या प्रा.स्वाती कोरी यांच्या भावी राजकीय वाटचालीबाबत गडहिंग्लजसह जिल्ह्यालाही कमालीची उत्सुकता आहे. सद्यस्थितीत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असे दोन्ही पर्याय त्यांच्यासमोर आहेत. परंतु, वडीलांच्याप्रमाणेच त्या जनता दलाचाच झेंडा खांद्यावर मिरवणार की देश/ राज्यपातळीवरील समविचारी 'नवा पर्याय'निवडणार ? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

गडहिंग्लज शहरात जनता दलाचा दबदबा असून तालुक्यातील गावोगावी निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.शिंदेंनी दोनवेळा गडहिंग्लजची आमदारकी,२५ वर्षे गडहिंग्लज साखर कारखान्याचे अध्यक्षपद भूषवले. तसेच अपवाद वगळता तब्बल ४० वर्षे गडहिंग्लज नगरपालिकेवरही त्यांचेच वर्चस्व राहिले आहे. 

शरद पवार आणि श्रीपतराव शिंदे यांचे ऋणानुबंध सर्वश्रृत आहेत. प्रसंगी स्वकीयांचा विरोध पत्करून पवारांनी शिंदेंना कारखान्यासाठी मदत केली होती.त्यामुळे राजकीय मतभेद असले तरी दोघांतील ‘मैत्री’ अखेरपर्यंत कायम राहिली. त्यामुळे खुद्द पवारांनीच हाक दिली तर स्वातीतार्इंना ‘ना’ म्हणता येणार नाही.

दुसऱ्या बाजूला मोदींच्या विरोधात राहूल गांधी यांनी उघडलेली मोहिम,त्याला देशभरात डाव्यांकडून मिळणारा प्रतिसाद आणि जिल्हा पातळीवर माजी मंत्री सतेज पाटील व शिंदे कुटुंबियांतील जिव्हाळ्याचे संबंध विचारात घेता सतेज पाटील यांच्याकडूनही स्वातीतार्इंना सोबत घेण्याचे प्रयत्न नाकारता येत नाही.

चंदगड / कागलची उमेदवारी ?

काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 'कागल' आणि 'चंदगड' दोन्ही मतदारसंघात सध्या प्रबळ उमेदवार नाही. त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांना रोखण्याकरिता 'कागल'साठी तर आमदार राजेश पाटील यांना रोखण्यासाठी 'चंदगड'साठी स्वातीताईंचे नाव पुढे येऊ शकते.

स्वातीताईंची जमेची बाजू !

स्वातीताईंनी शोकसभेतच श्रीपतराव शिंदेंच्या संघर्षाचा आणि विचाराचा वसा पुढे चालविण्याची ग्वाही दिल्यामुळे  शिंदेंच्या चाहत्यांचे पाठबळ त्यांना आपसूकच मिळाले आहे.
त्यांच्याकडे उत्तम वक्तृत्व आणि संघटन कौशल्यही असून त्यांनी दोनवेळा नगराध्यक्षपद समर्थपणे सांभाळले आहे.तसेच एकदा चंदगड विधानसभेची निवडणूकही लढवली आहे.

'जनसुराज्य'कडूनही संधी !

स्वातीताई भाजपमध्ये जाणे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी 'जनसुराज्य'च्या तिकिटावर निवडणूक लढवावी,असे प्रयत्न होवू शकतात.यापूर्वी गडहिंग्लज नगरपालिका व कारखान्यात ज.द-जनसुराज्य आघाडीची सत्ता होती.तव्दत, जनता दलाने आपल्यासोबत यावे असा मुश्रीफ यांचाही प्रयत्न आहे.

दिगज्जांकडून 'धीर' !

शरद पवार यांनी भ्रमणध्वनीवरून तर पालकमंत्री मुश्रीफ, उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री विनय कोरे  व सतेज पाटील आदींनी सांत्वनाच्या निमित्ताने प्रत्यक्ष भेटून शिंदे कुटुंबियांना 'धीर' दिला आहे.

Web Title: Curious about Swati Kori upcoming move in Gadhinglaj politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.