बागल चौकात कुशनचे दुकान खाक चार दुकानांना झळ : लाखो रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 01:08 AM2019-11-14T01:08:04+5:302019-11-14T01:08:49+5:30
या मार्केटमध्ये दुकानगाळ्यात पोटमाळ्यावरील मोठ्या गोदामामध्ये कुशन कव्हरसह शेजारील दुकानाचे हार्डवेअरचे साहित्य मोठ्या प्रमाणावर होते, त्यालाही आग लागून ती भडकली. याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहणाºया आंबले कुटुंबीयांना तत्काळ बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.
कोल्हापूर : बागल चौक येथील लक्ष्मीबाई आंबले मार्केटमधील कुशन कव्हरच्या दुकानाला बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक आग लागून लाखो रुपयांचे कुशनचे साहित्य खाक झाले. तासभराच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाचे तीन बंब आणि परिसरातील नागरिकांच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविले; पण ही धुमसणारी आग विझविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरूच होते. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आगीचे नेमके कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही.
बागल चौकातील सुधाकर कुशन कव्हरच्या दुकानातून रात्री साडेदहाच्या सुमारास धुराचे लोट बाहेर येत असल्याचे बागल चौकातील कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी अग्निशमन दलाला कळविले. दरम्यान, कार्यकर्त्यांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला; पण कुशन कव्हरचे साहित्य जळत असल्याने आगीची तीव्रता वाढली. त्यामुळे नागरिकांनी बागल चौकात मोठी गर्दी केली. दुकानाशेजारील लक्ष्मी हार्डवेअर व यशोधन पानशॉपलाही आगीची झळ लागून काही साहित्य जळाले. या मार्केटमध्ये दुकानगाळ्यात पोटमाळ्यावरील मोठ्या गोदामामध्ये कुशन कव्हरसह शेजारील दुकानाचे हार्डवेअरचे साहित्य मोठ्या प्रमाणावर होते, त्यालाही आग लागून ती भडकली. याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहणाºया आंबले कुटुंबीयांना तत्काळ बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.
तातडीने प्रतिभानगर फायर स्टेशनची गाडी घटनास्थळी दाखल झाली. आगीची तीव्रता कळल्याने ताराराणी चौक, टिंबर मार्केट येथील असे एकूण तीन बंब तातडीने पाठोपाठ पोहोचले. अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी रणजित चिले, मनीष रणभिसे, दस्तगीर मुल्ला व १० कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले.
दक्षतेमुळे मोठा अनर्थ टळला
गाळ्यांमध्ये इतर हार्डवेअर, फर्निचरची अनेक दुकाने आहेत. सुदैवाने त्यांना हानी पोहोचली नाही. स्थानिक बागल चौक मंडळाचे कार्यकर्ते ,नागरिक व अग्निशमन विभागाने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने अनर्थ टळला.