गांजा सेवनप्रकरणी तरूणीसह चौघे ताब्यात, कोल्हापूर टाकाळा येथील कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:49 AM2018-06-23T00:49:33+5:302018-06-23T00:50:10+5:30
गांजा सेवन केल्याप्रकरणी पुण्यातील तरुणीसह तीन महाविद्यालयीन तरुणांना राजारामपुरी पोलिसांनी टाकाळा येथील नवीन बागेत शुक्रवारी सायंकाळी पकडले तर एक तरुणी दुचाकीवरून पसार झाली
कोल्हापूर : गांजा सेवन केल्याप्रकरणी पुण्यातील तरुणीसह तीन महाविद्यालयीन तरुणांना राजारामपुरी पोलिसांनी टाकाळा येथील नवीन बागेत शुक्रवारी सायंकाळी पकडले तर एक तरुणी दुचाकीवरून पसार झाली. या चौघांना पकडून पोलिसांनी ठाण्यात आणले. त्यांच्याकडून गांजाच्या तीन ग्रॅमच्या तीन पुड्या, तीन सिगारेट पाकिटेअसे साहित्य पोलिसांनी जप्त केले.
याबाबत पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले की, राजारामपुरी परिसरात टाकाळा भागात नवीन उद्यान तयार केले आहे. या ठिकाणी शुक्रवारी सायंकाळी दोन तरुणी व तीन तरुण गांजा सेवन करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण यांच्यासह महिला पोलीस, कॉन्स्टेबल घटनास्थळी गेले. त्याठिकाणी दोन तरुणी व तीन तरुण असे एकूण पाचजण गांजा सेवन करत असल्याचे त्यांना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
पोलीस आल्याचे पाहताच त्यातील एक तरुणी आपल्या दुचाकीवरून पसार झाली. पोलिसांनी या चौघांना पकडून पोलीस ठाण्यात आणले. टाकाळा येथे येण्यापूर्वी ताराबाई पार्क येथे एका ठिकाणी त्यांनी मद्यप्राशन केले होते. त्याच्याकडून प्रत्येकी तीन ग्रॅमच्या तीन पुड्या, दोन सिगारेट पाकिटे मिळाली.
यातील संशयित बी.बी.ए., बी.कॉम व बी.सी.ए.चे शिक्षण घेत आहेत तर पुण्यातील तरुणी बायो टेक्नॉलॉजीच्या शिक्षणासाठी कोल्हापुरात आली आहे. या तरुणीचे वडील परदेशात तर आई पुणे येथे एकटीच राहते. पसार झालेली तरुणी ही कसबा बावडा परिसरातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संशयितांवर अंमली पदार्थ विरोधी अधिनियम ८ (क) २७ या कलमानुसार गुन्हा दाखल करणार आहोत. याप्रकरणी ताब्यात घेतलेल्यांच्या पालकांना बोलावून घेण्यात येणार आहे. हा गांजा कुठून आणला, कोणी दिला याच्या मुळाशी जाऊन तपास करणार असल्याचे औदुंबर पाटील यांनी सांगितले.
या कारवाईत महिला कॉन्स्टेबल वनिता घारगे, शोभा सुतार, दीपाली कांबळे यांच्यासह कॉन्स्टेबल सुनील जवाहिरे, युवराज पाटील, नीलेश डोंगरे, चालक रामचंद्र पांडे आदींचा सहभाग होता.
ती तरुणी घरात पळाली
पुण्यातील ही तरुणी नशेत होती. ती पोलीस आल्याचे पाहताच टाकाळा येथे एका घरात गेली पण महिला पोलिसांनी तिला घराबाहेर काढत पोलीस ठाण्यात आणले.