दागिने लूटप्रकरणी सराईत ताब्यात -: संशयित राधानगरीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 06:35 PM2019-09-27T18:35:12+5:302019-09-27T18:45:31+5:30

कोकिसरे बांधवाडी येथील आनंदी नारकर व त्यांचे पती १६ एप्रिलला दुपारी जेवण आटोपून घरात विश्रांती घेत असताना हेल्मेटधारी अज्ञात व्यक्ती त्यांच्या घरात गेली. त्याने आनंदी यांना काही कळायच्या आत त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे एक आणि अर्धा तोळ्याचे एक अशी सोन्याची दोन मंगळसूत्रे हिसकावून घेत धूम ठोकली.

In custody for jewelry loot | दागिने लूटप्रकरणी सराईत ताब्यात -: संशयित राधानगरीचा

दागिने लूटप्रकरणी सराईत ताब्यात -: संशयित राधानगरीचा

Next
ठळक मुद्देकोकिसरेत एप्रिलमध्ये घडला होता प्रकार

वैभववाडी : कोकिसरे बांधवाडी येथील आनंदी दत्ताराम नारकर (७५) या वृद्धेला लुटणा-या उत्तम राजाराम बारड (२७, रा. धामोड, ता. राधानगरी) या सराईतास स्थानिक गुन्हा शाखा आणि वैभववाडी पोलिसांनी कोल्हापुरातून ताब्यात घेतले. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने रविवार २९ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. त्यामुळे एप्रिल-मे दरम्यान वैभववाडी तसेच तळेरे, कासार्डे परिसरात घडलेल्या लुटीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.

कोकिसरे बांधवाडी येथील आनंदी नारकर व त्यांचे पती १६ एप्रिलला दुपारी जेवण आटोपून घरात विश्रांती घेत असताना हेल्मेटधारी अज्ञात व्यक्ती त्यांच्या घरात गेली. त्याने आनंदी यांना काही कळायच्या आत त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे एक आणि अर्धा तोळ्याचे एक अशी सोन्याची दोन मंगळसूत्रे हिसकावून घेत धूम ठोकली. त्यामुळे नारकर दाम्पत्याने आरडाओरडा केला. परंतु, शेजारी त्यांच्या घरी पोहोचण्यापूर्वीच चोरटा दुचाकीवरून  पसार झाला होता.

वैभववाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांनी आनंदी नारकर यांनी सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे कुडाळ येथील रेखाचित्रकार रजनीकांत कदम यांच्याकडून संशयिताचे रेखाचित्र तयार करून घेतले होते. ते रेखाचित्र कोल्हापूर, बेळगाव, रत्नागिरी आदी भागात पाठवून स्थानिक गुन्हा शाखा तसेच वैभववाडी पोलिसांनी गेले चार-पाच महिने तपास सुरू ठेवला होता.

कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयित बारड याला गुन्हा करताना पोलिसांनी पकडल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हा शाखेचे निरीक्षक पाटील व बाकारे यांनी संशयित बारड याला कोल्हापूर न्यायालयातून ताब्यात घेतले आहे. त्याला कणकवली न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला रविवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. 

 

आणखी गुन्ह्यांची उकल होणार ?

कोकिसरे बांधवाडी येथील आनंदी नारकर यांना घरात घुसून त्यांना लुटले त्या महिनाभरात नाधवडे माध्यमिक विद्यालय तसेच तळेरे आणि कासार्डे येथील महिलांना चोरट्यांनी लक्ष्य बनविले होते. उत्तम बारड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कोल्हापुरात ५० ते ६० गुन्ह्यांची नोंद आहे. बारड हा दोन वर्षांपूर्वी कोकिसरेत रेल्वे फाटकानजीक वास्तव्यास होता. त्यामुळे त्याच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.

Web Title: In custody for jewelry loot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.