बँक अधिकाऱ्यांच्या मनमानी विरोधात ग्राहक आक्रमक
By admin | Published: January 6, 2015 09:20 PM2015-01-06T21:20:39+5:302015-01-06T21:53:12+5:30
ठिकपुर्लीतील प्रकार : देना बँकेला ठोकले ताळे
तुरंबे : राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली येथील देना बॅँकेचे शाखाधिकारी अनिल डी. शहा हे ग्राहकांशी उद्धट वर्तन करतात व अपमानास्पद वागणूक देतात याच्या निषेधार्थ बॅँकेच्या ग्राहक व खातेदारांनी शाखेसमोर आंदोलन करून शहा यांच्या बदलीची मागणी केली व बॅँकेस टाळे ठोकले.
ठिकपुर्ली (ता. राधानगरी) येथे देना बॅँकेची शाखा आहे. या बॅँकेतून ठिकपुर्लीसह परिसरातील शेतकरी व ग्राहकांच्या आर्थिक देवघेवीचे व्यवहार होतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या शाखेचे अधिकारी अनिल शहा हे ग्राहकांना योग्यरीतीने सेवा पुरवत नाहीत, तसेच ते ग्राहकांशी व महिला बचत गटांच्या महिलांंशी उद्धट पद्धतीने बोलतात, असा अनेकांचा आक्षेप आहे. अपमानास्पद वागणूक देतात, निरीक्षर लोकांना माहिती द्यायला टाळाटाळ करतात, अशा तक्रारीदेखील ग्रामस्थांनी शाखेच्या दारात बोलून दाखविल्या. आज, मंगळवारी सकाळी
दहा वाजता संतप्त ग्रामस्थ व बॅँकेच्या ग्राहकांनी बॅँकेच्या शाखेला टाळे ठोकले. यावेळी ग्रा.पं.सदस्या नूतन बाबासाहेब पाटील, राजेंद्र कांबळे, सरपंच चंद्रकांत संकपाळ, पं.स. सदस्य प्रल्हाद पाटील, उपसरपंच रणजित पाटील, माजी सरपंच राजू चौगले, रघुनाथ चौगले, पांडुरंग देवकर, सुनीता पडळकर, महादेव एकल, आदी उपस्थित होते. चर्चेनंतर बँकेचे टाळे उघडण्यात आले व व्यवहार सुरळीत झाले. यावेळी ग्राहकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ग्रा.पं.सदस्या नूतन पाटील म्हणाल्या, शाखाधिकारी बचत गटांच्या महिलांशी उद्धट शब्दांत बोलतात. महिलांना अपमानास्पद वागणूक देतात. निरक्षर लोकांना सेवा व्यवस्थित देत नाहीत. (वार्ताहर)
बॅँकेला शिस्त लावण्यासाठी मी केलेली कार्यवाही ग्राहकांना रूचली नाही. सप्टेंबरपासून मी या शाखेकडे काम करतो. ग्राहकांशी संबंधित केलेल्या कायदेशीर बाबी लोकांना मान्य नसल्याने लोकांचा रोष पत्करावा लागला.
अनिल शहा,
देना बॅक, शाखाधिकारी.