ग्राहकांची इंटरनेट बॅँकिंगला पसंती - ‘बँक आॅफ इंडिया’चे व्यवस्थापक एम. जी. कुलकर्णी
By admin | Published: December 24, 2014 09:34 PM2014-12-24T21:34:28+5:302014-12-25T00:18:10+5:30
किमया तंत्रज्ञानाची : कोल्हापुरातील ४० टक्के ग्राहकांकडून वापर, अपवाद वगळता बँकेकडे जाण्याची गरजच नाही-----थेट संवाद
बँकिंग क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत झपाट्याने बदल झाले़ एटीएम, इंटरनेट बँकिग, किआॅस्क सेंटर, बँक मित्र, ई-गॅलरीचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला़ इंटरनेट बँक ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. कोल्हापुरातील एकूण ग्राहकांपैकी ४० टक्के ग्राहक नेट बँकिंगचा वापर करीत आहेत. पूर्वीपासून विविध योजनांचा संबंध बँकेशी येत असला तरी आधार, जनधन योजना, आर्थिक समावेशन आणि विविध विमा योजनांच्या माध्यमातून बँकिंगपासून दूर असलेले नागरिक बँकेच्या कार्यकक्षेत झपाट्याने येत आहेत़. किआॅस्क सेंटर, एटीएम, बँक मित्र,
ई-गॅलरीमुळे अपवाद वगळता बँकेकडे जाण्याची गरजच राहिली नाही, अशी किमया तंत्रज्ञानाने या क्षेत्रात साधली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याची अग्रणी (लीड) बँक असलेल्या बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक एम़ जी़ कुलकर्णी यांच्याशी साधलेला हा संवाद ़़़़
प्रश्न : बँकिंग व्यवसायात तंत्रज्ञानामुळे गेल्या दहा वर्षांत आमूलाग्र बदल झाले आहेत. यामध्ये इंटरनेट बँकिंगच्या सहभागाबद्दल काय सांगाल?
उत्तर : इंटरनेट बँकिंगमुळे बॅँकिंग क्षेत्रात गतिमान बदल झाले आहेत़ इंटरनेट ग्राहकांची संख्या वाढत आहे़ एकूण ग्राहकसंख्येपैकी ४० टक्के ग्राहक इंटरनेट बँकिंगचा वापर करीत आहेत़ नेट बँकिंगने भौगोलिक सीमांचे बंधन कधीच ओलांडले आहे. चेकबुकचा वापर कमी होत आहे़ संवादाची प्रक्रिया अधिक गतिमान झाली असून, किआॅस्क सेंटरच्या माध्यमातून तिथल्या नागरिकांना बँकिंगच्या विविध सुविधा मिळत आहेत़ इंटरनेटच्या वापरामुळे कंत्राटी स्वरूपात का असेना, बॅँकिंग क्षेत्रात रोजगार निर्माण होत आहे़
प्रश्न : तंत्रज्ञान वाढले, पण तरीही अनेक बँकांमधून ग्राहकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे ?
उत्तर : शासनाच्या विविध योजना राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून राबविल्या जातात़ आर्थिक समावेशन आणि आता जनधन योजना या त्या प्रमुख योजना आहेत़ कामाच्या व्यापाच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे़; पण तरीही ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी ग्रामीण भागातील आणि उपनगरातील ग्राहकांना त्यांना सोयीस्कर असलेल्या ठिकाणी किआॅस्क सेंटरच्या माध्यमातून खाती उघडण्यापासून ते विशिष्ट मर्यादेपर्यंत पैसे भरण्यापासून आणि काढण्यापर्यंत अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत़ यासाठी बँक मित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे़ बँक आॅफ इंडियाचे सध्या १२४ बँक मित्र कार्यरत असून २६ किआॅस्क सेंटर आहेत़ बँक मित्रांना हॅँड हेल्ड डिव्हाईस देण्यात आली आहेत़
ई-गॅलरीची सोयही होत असून, या स्वयंचलित गॅलरीमध्ये पैसे काढण्याची-भरण्याची तसेच पासबुक प्रिंट होण्याची सोयही उपलब्ध आहे.
प्रश्न : सायबर क्राइमचा धोका वाढत आहे. बँक स्तरावर काय उपाययोजना केल्या जात आहेत ?
उत्तर : कोल्हापूरमध्ये बँकेशी संबंधित सायबर क्राइम घटनांचे प्रमाण ०़०१ टक्के आहे़ एटीएम, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड हरवल्यास बॅँकेने दिलेल्या हॉटलाईनला फोन केल्यास ते कार्ड त्वरित ब्लॉक केले जाते़ त्यामुळे पुढील धोका टळतो़ एटीएमचा पिन किंवा पासवर्ड मागणारा कोणताही मेसेज असल्यास त्याला प्रतिसाद न देण्याचा मेसेज बँकेकडून ग्राहकाला पाठविण्यात येतो़ ग्राहकांनीही बक्षिसाच्या आमिषाला न बळी पडता आपला बँक खाते क्रमांक,
एटीएम-डेबिट कार्डचा पिन व पासवर्ड कुणाला देऊ नये़
प्रश्न : राष्टीयीकृत बँकांसमोरील आव्हाने ?
उत्तर : विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या कर्जवसुलीस योग्य प्रतिसाद मिळत नाही़ ही कर्जखाती एऩ पी़ ए.मध्ये जाण्याचे प्रमाण वाढले आहे़ शासकीय योजनांचा भडिमार सातत्याने होत असतो, त्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे़ शासकीय योजनांतील कर्जप्रकरणासाठी राजकीय हस्तक्षेप त्रासदायक ठरतो.
प्रश्न : जनधन योजनेचा गाजावाजा मोठ्या प्रमाणावर होत आहे. योजनेस कसा प्रतिसाद आहे ?
उत्तर : प्रत्येक कुटुंबाला बँकिंगच्या प्रवाहात आणणे हे जनधन योजनेचे उद्दिष्ट आहे़ जनधनचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे़ आतापर्यंत दोन लाख सव्वीस हजार खाती या योजनेंतर्गत उघडण्यात आली आहेत़ या योजनेंतर्गत ३० हजारांचा जीवन विमा आणि एक लाख रुपयांचा अपघाती विमा देण्यात येतो; पण विमा संरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी रूपे - एटीएम कार्डचा वापर आवश्यक आहे. तसेच या खात्यावरून पंचेचाळीस दिवसांतून एकदा व्यवहार होणे गरजेचे आहे. लोकांना बँकिगच्या प्रवाहात आणल्यानंतर बँक मित्रांकडून ग्राहकांना आर्थिक साक्षर करण्याचे कामही सुरू राहणार आहे.
- संदीप खवळे
बँकिंग व्यवसायाचे विकेंद्रीकरण
आर्थिक समावेशन आणि जनधन योजनेमुळे बहुतांश नागरिक बँकिंगच्या प्रवाहात येत आहेत़ योजनेंतर्गत लीड बँकेच्या कार्यकक्षेतील बँकांनी २ लाख २६ हजार खाती उघडलेली आहेत़ पाच टक्के काम राहिलेले आहे़
जनधन अंतर्गत खाते उघडण्याची अंतिम मुदत २६ डिसेंबर असून, केवळ तीन हजार खाती अद्याप उघडावयाची आहेत़ ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर फॉर एलपीजी’ या योजनेअंतर्गत सबसिडीची रक्कम थेट खात्यात जमा होणार असून, ही योजना १ जानेवारी २०१५ पासून संपूर्ण भारतात लागू होणार आहे़
नागरिकांनी बँकेला आणि एलपीजी वितरकाला आधार क्रमांक कळवावा़ बँक मित्र, एटीएम आणि किआॅस्क सेंटर्स, नेट बँकिग यांमुळे आता बँकांच्या कामाचे विकेंद्रीकरण झाले असून, पूर्वीप्रमाणे बँकेत जाण्या- येण्याचा ग्राहकांचा वेळ वाचत आहे.