‘झेंडू’च्या दराने ग्राहकांना घाम : ऐन सणासुदीत दरात दुप्पट वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:59 PM2019-08-24T12:59:06+5:302019-08-24T13:02:40+5:30
प्रलयकारी महापुराने फूलशेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेल्या फुलांच्या बागा अक्षरश: उद्ध्वस्त झालेल्या आहेत; त्यामुळे सध्या बाजारात फुलांची आवक एकदमच मंदावली असून, दरात मोठी वाढ झाली आहे. ‘झेंडू’, ‘निशिगंध’, ‘गलाटा’ ही फुलेच बाजारात नसल्याने दर दुप्पट झाले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात फुलांच्या टंचाईने ग्राहकांना मात्र घाम फुटला आहे.
राजाराम लोंढे
कोल्हापूर : प्रलयकारी महापुराने फूलशेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेल्या फुलांच्या बागा अक्षरश: उद्ध्वस्त झालेल्या आहेत; त्यामुळे सध्या बाजारात फुलांची आवक एकदमच मंदावली असून, दरात मोठी वाढ झाली आहे. ‘झेंडू’, ‘निशिगंध’, ‘गलाटा’ ही फुलेच बाजारात नसल्याने दर दुप्पट झाले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात फुलांच्या टंचाईने ग्राहकांना मात्र घाम फुटला आहे.
महापुरामुळे कोल्हापुरात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस, भात, सोयाबीन, भुईमूग पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली आहेत. नदी, ओढ्यांजवळ असलेली पिके पुराच्या पाण्याने गेली; पण इतर ठिकाणची पिके अतिवृष्टीने वाहून गेली आहेत.
खरीप पिकांबरोबरच फूलशेतीचेही नुकसान झाले असून, फुलांच्या बागा अक्षरश: उद्ध्वस्त झालेल्या आहेत. श्रावणापासून विविध सण सुरू होत असल्याने शेतकरी मेपासून फूल रोपांची लागण करतात. साधारणत: अडीच-तीन महिन्यांनी फुले लागण्यास सुरुवात होते. यातील बहुतांशी बागांचा अतिवृष्टी व महापुराने सुपडासाफ झाला आहे.
फूलबाजारात आवक एकदम रोडावली असून, मागणी जास्त आहे. श्रावण महिन्याचा सांगता होत असताना पूजा-अर्च्या अधिक असतात. त्यातच आठ-१0 दिवसांवर गणेशोत्सव आल्याने व्यापाऱ्यांची घालमेल सुरू झाली आहे.
एरव्ही घाऊक बाजारात भगवा, पिवळा झेंडू ४० रुपये, तर निशिगंध ८०-९० रुपये किलो असायचा. सध्या भगवा झेंडू १०० रुपये, तर पिवळा झेंडू ७० रुपये किलो झाला आहे. किरकोळ बाजारात १६० रुपये किलोपर्यंत दर पोहोचल्याने ग्राहकांची चांगलीच पंचाईत झाली आहे.
गलाटा फुलाच्या दरातही दुप्पट वाढ झाली असून, १५० रुपये किलो दर सुरू आहे. कोल्हापूर बाजारात राशिवडे, कंदलगाव, गडमुडशिंगी, हेर्ले, वडगाव, आष्टा, बागणी, किणी, वाठार यांसह मिरज येथूनही माल येतो. त्याचा परिणाम थेट फुलांच्या हारावर झाला असून, १५0 ते २00 रुपये हाराची किंमत आहे.
किरकोळ व्यापारी घरातच
कोल्हापुरातून फुले खरेदी करून त्याच्या माळा विक्री करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण भागात मासिक गिºहाईक असल्याने या दराने माळा देणे परवडत नाहीत.
गणेशोत्सवात दर गगनाला भिडणार
आगामी गणेशोत्सवात फुलांचा दर गगनाला भिडणार आहेत. त्यानंतर येणाऱ्या दसरा आणि दिवाळीत पूजेसाठी फुले उपलब्ध होणार का? अशी भीती व्यापाऱ्यामधून व्यक्त होत आहे.
घाऊक बाजारातील फुलांचे दर प्रतिकिलो असे-
- भगवा झेंडू-१००,
- पिवळा झेंडू-७०,
- निशिगंध-२००,
- गलाटा-१५०,
- शेवंती -१३०.
अतिवृष्टी व महापुराने फुलांच्या बागा उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. आवक कमी असल्याने दर तेजीत आहे, आगामी सणासुदीच्या काळात हे दर आणखी भडकतील.
- सर्जेराव माळी (शेतकरी)