आठवडी बाजाराला ग्राहकांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:20 AM2021-04-19T04:20:52+5:302021-04-19T04:20:52+5:30
कोल्हापूर : वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी महापालिका प्रशासन व पोलिसांनी नागरिकांनी विनाकारण फिरू नये यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. ...
कोल्हापूर : वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी महापालिका प्रशासन व पोलिसांनी नागरिकांनी विनाकारण फिरू नये यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे रविवारी लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ, गंगावेश आदी ठिकाणी बाजाराचा दिवस असूनही विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागली.
गेल्या चार दिवसांपासून शहरात संचारबंदी सुरू करण्यात आली आहे. पहिले दोन दिवस संचारबंदी असूनही मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ, महाद्वार रोड, गंगावेश आदी ठिकाणच्या बाजारात मोठी गर्दी करीत होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढला होता. वारंवार सूचना देऊनही नागरिक पुन्हा रस्त्यावर उतरू लागले होते. महापालिका व पाेलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर ही गर्दी कमी झाली. विशेष म्हणजे बेकरी माल खरेदीसाठी अनेकजण शिवाजी पेठ, सानेगुरुजी वसाहत आदी ठिकाणांहून येत असल्याचे चित्र होते. यावर नामी शक्कल लढवत महापालिका प्रशासनाने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना रॅपिड ॲंटिजेन टेस्ट करण्यास सुरुवात केली. त्यासोबतच पोलिसांनी वाहनधारकांवर वाहनजप्तीची कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही अंशी भाजी खरेदीच्या बहाण्याने फिरणाऱ्यांना चाप बसला. त्यासोबतच फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांना सोशल डिस्टन्स ठेवून व योग्य ती काळजी घेऊन व्यवसाय करण्याच्या सूचना दिल्या. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून रविवारी आठवडी बाजार असूनही लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ आणि गंगावेश येथील बाजारपेठेत वर्दळ रोडावली होती. केवळ विक्रेतेच दिसत होते. महापालिका कर्मचारी फेरीवाल्यांनाही लस घेण्याच्या सूचना देत होते.
फोटो : १८०४२०२१-कोल-लक्ष्मीपुरी बाजार
ओळी : संचारबंदीमुळे आठवडी बाजार असूनही रविवारी लक्ष्मीपुरी बाजारपेठेतील वर्दळ रोडावली होती.
(सर्व छाया : नसीर अत्तार)